बालसुधारगृहात दोन मुलांचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

वर्धा - गोपुरी येथील शासकीय निरीक्षणगृह व बालसुधारगृहातील दोन अल्पवयीन मुलांचे काळजीवाहकाने लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक आणि विकृत प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराकडे बालसुधारगृहाच्या अधीक्षकाने दुर्लक्ष केल्यामुळे तीन मुलांनी अमानुष मारहाणीला न जुमानता बालकल्याण समितीच्या बैठकीत या प्रकाराला वाचा फोडली. याप्रकरणी काळजीवाहक गणेश राजमलवार आणि अधीक्षक महेश हजारे यांना बुधवारी (ता. १०) रात्री गजाआड करण्यात आले.

आरोपी गणेश राजमलवार हा एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करीत असताना दुसऱ्या मुलाने पाहिले. त्यामुळे संतापलेल्या गणेशने त्या मुलाला बेदम मारहाण केली,  तसेच आरती चौकात संबंधित मुलाला शिवीगाळ करून कुणालाही न सांगण्याविषयी धमकावले. याबाबत अधीक्षक महेश हजारे यांच्याकडे तक्रार करण्यात आली; पण त्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यांनीही हा प्रकार कुणालाही न सांगण्याची धमकी दिली.

आपली तक्रार अधीक्षकांकडे केल्याची माहिती मिळताच गणेश राजमलवार याने गैरकृत्याला अडथळा ठरलेल्या मुलाला पुन्हा बेदम मारहाण केली. अखेर मारहाण झालेल्या मुलाने दोन मित्रांच्या सहकार्याने बालकल्याण समितीच्या बैठकीत या अत्याचाराचा पाढाच वाचला. हे ऐकून समितीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काच बसला. याबाबत समितीच्या वतीने शहर पोलिसांत लगेच तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिस अधिकारी पी. टी. एकुरले यांनी मुलांचे बयाण नोंदविले. या प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या बालसुधारगृहातील सर्व मुलांना सुरक्षेच्या दृष्टीने दुसऱ्या बालसुधारगृहात हलविण्यात आले आहे.

पीडितांची संख्या वाढण्याची शक्‍यता

पोलिस तपासात पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्‍यता असल्याचे शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिरतोडे यांनी सांगितले. ज्या तीन मुलांनी समितीसमोर बयाण दिले, त्यांनी आपले थरकाप उडविणारे अनुभव सांगितले. लैंगिक शोषणाविषयी कुणासमोर वाच्यता केली जाऊ नये म्हणून आरोपी राजमलवार हा बेदम मारहाण करायचा. कधी रुग्णालयात न्यायचा, तर कधी तसेच सोडून द्यायचा. रुग्णालयात नेले तर डॉक्‍टरांना खेळता खेळता पडला, असे सांगायचा, असे बयाणही या तीन धाडसी मुलांनी दिले.