मुख्यमंत्र्यांच्या सर्जिकल स्ट्राइकने विजय - परिणय फुके

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

नागपूर - 'भंडारा-गोंदियात जाऊन मेला, भाजपने गेम केला' अशा चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होत्या. मात्र, आपणास विजयाचा ठाम विश्‍वास होता. त्याहीपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त भरोसा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः मतदारसंघात शिरून सर्जिकल स्ट्राइक केले आणि आपल्या विजयाचे दार उघडले, असे भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी सांगितले.

नागपूर - 'भंडारा-गोंदियात जाऊन मेला, भाजपने गेम केला' अशा चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होत्या. मात्र, आपणास विजयाचा ठाम विश्‍वास होता. त्याहीपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त भरोसा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः मतदारसंघात शिरून सर्जिकल स्ट्राइक केले आणि आपल्या विजयाचे दार उघडले, असे भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांनी सांगितले.

फुके यांनी बुधवारी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे सर्व नेते तसेच ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली सर्वांचे आभार मानले. भंडारा-गोंदिया मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गड मानला जातो. राजेंद्र जैन अत्यंत जवळचे असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मतदारांपासून तर सर्वच प्रकारचे बळ राष्ट्रवादीकडे होते.

भाजपकडून कोणी लढण्यास होकार देत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. कुठलाच मागाचपुढचा विचार न करता त्यांना होकार दिला. येथेच आपण विजयाची पहिली पायरी चढलो. मुख्यमंत्र्यांचे व्हीजन आणि स्वभावाची आपल्याला जवळून कल्पना होती. काहीतरी राजकीय आखाडे बांधूनच त्यांनी विचारणा केल्याची खात्री होती. त्यानंतर तब्बल एक महिना मतदारसंघ पिंजून काढला. सुदैवाने सर्व मनासारखे जुळून आले. लोकही मनासारखी भेटली. लोग आते गये और कारवां बढता गया... असेच झाल्याचे फुके यांनी सांगितले.

वडिलांनी प्रथमच देवाला हात जोडले
आजोबा आणि वडील अनेक वर्षे राजकारणात सक्रिय होते. मात्र, उभ्या आयुष्यात त्यांनी देवळाची पायरी चढली नाही. देवाचे अस्तित्वच त्यांना मान्य नव्हते. आपल्या विजयाची बातमी समजातच वडील रमेश फुके यांनी देवाला हात जोडले. त्यांचाही आता चमत्कारावर विश्‍वास बसला आहे.

अनुवांशिकता संपुष्टात
वडील कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते. स्व. श्रीकांत जिचकार यांचे कट्टर समर्थक होते. जिचकार साहेब भंडारा लोकसभेची निवडणूक लढले, तेव्हा संपूर्ण नियोजनच वडिलांच्या हाती होते. वडील आणि आजोबांची नावे अनेकदा उमेदवारांच्या यादीत झळकळी. मात्र, उभ्या आयुष्यात त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. कॉंग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीत दोनदा अखेरच्या क्षणी उमेदवारी देण्यास नकार दिला, हा एकप्रकारचा कौटुंबिक योगच होता. मात्र, आपल्या विजयाने उमेदवारीला मुकण्याची राजकीय अनुवांशिकता संपुष्टात आली.

कोणाशीच वैर नाही
कॉंग्रेसने डावलले तरी आपला कोणावरही रोष नाही किंवा कोणाशी वैरसुद्धा नाही. राजकारणात हे चालतच असते. प्रत्येकालाच आपल्या अस्तित्वाची चिंता असते. मात्र, आता विजयाने झाले गेले सर्व विसरलो. आजवर आपण मित्र अधिक जपले. तेच जास्त कामाला आलेत.