वणीतील कोळसा खाणी पाहण्याची आता पर्यटकांना संधी

coal mine
coal mine

वणी (जि. यवतमाळ) : देशातील उद्योग-व्यवसायात जिल्ह्यातील वणी येथील कोळसा खाणीचे मोठे योगदान आहे. या खाणीच्या परिसरात आतापर्यंत सर्वसामान्य व्यक्तींना जाण्यास सुरक्षिततेच्यादृष्टीने बंदी होती. मात्र, भांदेवाडा व उकणी येथील कोळसा खाणी आता पर्यटकांनाही पाहता येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ व वेकोलि यांच्या संयुक्त विद्यमाने ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागातर्फे शुक्रवारी (ता.23) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा एकदिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. यात पर्यटन विभाग व वेकोलिच्या अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पर्यटकांसाठी कशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, याची माहिती दिली. वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील भूगर्भातील व उकणी येथील खुली अशा दोन कोळसा खाणींमध्ये सध्या कोळशाचे उत्खनन सुरू आहे. यासोबतच खाण परिसरातील श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज समाधी स्थळ व कोळसा खाणीला लागणार्‍या लोखंडाचे साहित्य बनविणारा कारखानाही पर्यटकांना पाहता येणार आहे. या चारही ठिकाणे पर्यटकांना एका दिवसात पाहता येणार आहेत. त्यासाठी नागपूर, अमरावती, यवतमाळ येथून पर्यटकांना येण्यासाठी पर्यटन विभागातर्फे खास वाहनासह नाश्ता, जेवणाची व गरज भासल्यास निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावरही याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महामंडळाचे अमरावतीचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत सवाई यांनी दिली. यावेळी वेकोलिचे (वणी नॉर्थ एरिया) महाप्रबंधक (संचालन) डॉ. सत्येंद्र कुमार, महप्रबंधक डॉ. आर. के. सिंह यांनी कोळसा खाणींबाबतची माहिती दिली.

भांदेवाडा येथील जमिनीअंतर्गत असलेली कोळसा खाण ही 1939पासून सुरू असून, ती खाण साडेचार किलोमीटरपर्यंत विस्तारली आहे. या खाणीतून उत्खनन केलेला कोळसा यंत्राच्या माध्यमातून जमिनीवर आणला जाऊन यंत्राद्वारेच थेट जडवाहनांमध्ये भरला जातो. या खाणीत जाण्यासाठी पर्यटकांना आता खास 200 रोपवे अर्थात हँगिंग खुर्च्या बनविण्यात आलेल्या आहेत. भूगर्भातील खाणीतील अशुद्ध व गरम हवा बाहेर काढण्यासाठी मोठ-मोठे पंखे बसविण्यात आलेले आहेत. बाहेरून शुद्ध व थंड हवा या खाणीत आणण्याचीही व्यवस्था आहे. त्यामुळे भुयारी खाणीत वातानुकूलित यंत्राप्रमाणेच थंड हवा अखंडितपणे सुरू आहे. या अंतर्गत खाणीत जाण्यासाठी कर्मचार्‍यांप्रमाणे पर्यटकांनाही डोक्यावर हेल्मट, लाइट, विशिष्ट बूट व कपडेही परिधान करणे बंधनकारक आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने आत खाणीत जाताना आगपेटी, लाईटर्स, कॅमेरा, मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. उकणी येथे असलेली कोळशाची खुली खाण ही वणी शहरापासून पाच किलोमीटरवर आहे. ही कोळसा खाण सहा किलोमीटपर्यंत विस्तारली आहे. खुल्या खाणीतून कोळसा उत्खनन बाराही महिने 24 तास अखंडितपणे सुरू आहे. या उत्खननासाठी जेसीबी, टीप्पर्स, बुलडोझर, जॅक-क्रेन, बुकेट्स आदी यंत्रांचा वापर केला जातो, अशी माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com