लैंगिक अत्याचाराच्या सहा विद्यार्थिनींच्या तक्रारी - विष्णू सवरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

खामगाव - आश्रमशाळेत सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. एसआयटीमार्फत त्याची चौकशी केली आहे, अशी खळबळजनक माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज खामगाव येथे दिली. पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करून दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल, असे सांगून या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून, एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अनेक विद्यार्थिनींचे गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक शोषण सुरू होते. या मुली दिवाळीच्या सुटीत आपल्या गावी गेल्या असता त्यांनी नातेवाइकांना माहिती दिल्यावर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थाध्यक्ष गजानन निंबाजी कोकरे, शिपाई इतूसिंग काळुसिंग पवार, मुख्याध्यापक प्राथमिक भरत विश्‍वासराव लाहुडकार, मुख्याध्यापक माध्यमिक डिगांबर राजाराम खरात, लॅब टेक्‍निशियन स्वप्निल बाबूराव लाखे, वसतिगृह अधीक्षक नारायण दत्तात्रय अंभोरे, स्वयंपाकी दीपक अण्णा कोकरे, कारकून विजय रामूजी कोकरे, स्त्री अधीक्षक ललिता जगन्नाथ वजिरे, स्वयंपाकी मंठाबाई अण्णा कोकरे, स्वयंपाकी शेवंताबाई अर्जुन राउत यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. दरम्यान, हे प्रकरण राज्यभर गाजत असून, सरकारवर टीका होत आहे.

आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार एकनाथ खडसे, आमदार आकाश फुंडकर यांनी आज पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेत भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर खामगाव येथे मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. विरोधकांनी राजकारण करू नये, असे सांगितले. दरम्यान, मंत्र्यांच्या भेटीप्रसंगी आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.

आरोपींना पोलिस कोठडी
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आज पाळा येथे आदिवासी आश्रमशाळेला भेट दिली. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा व महिला बालविकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा.
- चित्रा वाघ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा