काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - विधानसभेत स्वबळाच्या धाडसी प्रयोगामुळे विरोधात बसावे लागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा हातात हात घेऊन उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज नागपुरात पत्रकारांशी वार्तालाप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज तसे स्पष्ट संकेत दिले.

नागपूर - विधानसभेत स्वबळाच्या धाडसी प्रयोगामुळे विरोधात बसावे लागल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा हातात हात घेऊन उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज नागपुरात पत्रकारांशी वार्तालाप करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज तसे स्पष्ट संकेत दिले.

आघाडीच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी राष्ट्रवादीचे टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. दुसरीकडे भाजपने शिवसेनेशी युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीनेही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच दोन्ही काँग्रेसचे नुकसान झाल्याचा आरोप जाहीर कार्यक्रमांमधून केला. त्याला चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात विचारणा केली असता, पवार यांनी आता आम्हाला जुनी उणीदुणी काढायची नसल्याचे सांगितले. 

काँग्रेसमध्ये आघाडीबाबत निर्णय घेण्याचे ज्यांना अधिकार त्यांच्याशी चर्चा झाली आहे. चर्चेला दोन्ही काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. त्यामुळे दोघांचीही इच्छा असेल, तर आघाडी होण्यास काहीच हरकत नाही, अशी आमची भूमिका असल्याचे सूचक वक्तव्य पवार यांनी केले.

मोर्चातून शेतकऱ्यांचा असंतोष
मराठा समाज मोठ्या प्रमाणावर शेतीशी निगडित आहे. आघाडीच्या कार्यकाळात वेळोवेळी त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत होते. ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली. मात्र, आताचे सरकार काहीच करीत नसल्यामुळे मराठा समाजाच्या मोर्चात लाखो शेतकरी सहभागी होऊन असंतोष व्यक्त करीत आहेत. 

ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा, ही मराठा समाजाची मागणी नाही. त्यात दुरुस्ती करावी आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी एवढीच मागणी आहे आणि ती स्वाभाविक आहे, असे पवार म्हणाले.

शिवसेनेचा स्वभावदोष 
‘सत्तेत असताना शिवसेनेचे मंत्री व नेते विरोधी पक्षात असल्यासारखे का वागत आहेत?’ या प्रश्‍नावर पवार यांनी हा शिवसेनेच्या स्वभावाचा दोष असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक पक्षाचा एक स्वभाव असतो. शिवसेना अनेक वर्षे विरोधी पक्षात होती. त्यामुळे विरोधी भूमिका हाच त्या पक्षाचा स्वभाव आहे. त्यामुळे आपण सत्तेत आहोत याचे भान नेत्यांना नसल्याची टिप्पणी पवार यांनी केली.

कुंडल्या कुणाच्या?
मुख्यमंत्र्यांकडे स्वपक्षातील, मित्रपक्षातील की विरोधी पक्षातील नेत्यांच्या कुंडल्या आहेत हे आपल्याला ठाऊक नाही. त्यामुळे आता ते कुठले अस्त्र वापरतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आमच्या हाती फक्त प्रार्थना करणे एवढेच आहे, असेही पवार म्हणाले.

Web Title: Congress-NCP alliance signals