महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे एकाच कंपनीला सातत्याने कंत्राट

विवेक मेतकर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे सर्व नियमांचे उल्लंघन करीत वरिष्ठांनी त्या कंपनीला कंत्राट देण्याचा डाव खेळला आहे, असा आरोप करीत अकोल्यातील एका स्पर्धकाने न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

अकोला - महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या पुरवठ्याच्या कंत्राटासाठी अखेर त्याच कंपनीला पात्र ठरविण्यात आले असून, एका शर्तीवर तब्बल 11 स्पर्धकांना पध्दतशिरपणे बाजुला करण्यात आले. या कंत्राटासाठी नियम, अटीमध्ये शिथिलता आणण्याच्या नावाखाली दुसऱ्यांदा काढलेल्या निवेदेतही त्याच विशिष्ट कंपनीचीच निविदा ग्राह्य धरण्यात आली. मंडळाचे सर्व नियमांचे उल्लंघन करीत वरिष्ठांनी त्या कंपनीला कंत्राट देण्याचा डाव खेळला आहे, असा आरोप करीत अकोल्यातील एका स्पर्धकाने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे वरीष्ठांचे मनसुबे उधळल्या जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र पशूधन विकास मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत मंडळाला डाटा एन्ट्री ऑपरेटर्स कंत्राट बेसवर पुरविले जातात. गेल्या तीन वर्षापासून हे मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट औरंगाबाद येथील सिनर्जीस सोल्युशन या कंपनीकडे आहे. दरम्यान, यावेळी अकोल्यातील श्री साई ई-सर्व्हिसेसने या प्रक्रियेत भाग घेऊन मनुष्यबळ पुरवठा करण्याची तयारी दर्शविली. पशुधन विकास मंडळाने यावर्षी 1 जुलै 2017 ते 30 जुन 2018 या कालावधीसाठी विविध ठिकाणाकरिता एकून 86 डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचा पुरवठा करण्याकरीता ई-निविदा मागितल्या. मंडळाचे मुख्यालय अकोला असून, कार्यकारी अधिकारी वैद्यकीय रजेवर असताना त्यांच्या स्वाक्षरीने ही निविदा काढली.

अनुभवाची जाचक अट -
या निविदेमध्ये निविदाकारास यापूर्वी कोणत्याही शासकीय कार्यालयास डाटा एन्ट्री ऑपरेटर हे मनुष्यबळ पुरविल्याचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असल्याची जाचक अट होती. या जाचक अटीवर आक्षेप घेत अकोल्यातील श्री साई ई-सर्व्हिसेस या कंपनीने ही अट शिथिल करून नव्याने निविदा प्रक्रीया राबविण्याची मागणी केली होती. यासाठी कंपनीला शासनस्तरावर मोठा संघर्ष करावा लागला.

अट जैसे थे -
अकोल्यातील श्री साई ई-सर्व्हिसेस या कंपनीने जाचक अटीवर आक्षेप घेऊन नव्याने निविदा काढण्यास भाग पाडले. तरी मंडळाने ती जाचक अट शिथिल केली नाही. मंडळाने 1 जानेवारी 2018 रोजी नव्याने निविदा प्रक्रीया राबवून निविदा मागितल्या. यामथ्ये एकून 12 स्पर्धकांनी निविदा भरल्या. जाचक अट कायम ठेवल्याने 1 स्पर्धक आपोआप स्पर्धेतून बाद झाले. मंडळाने त्याच अटीनुसार आधीचयाच कंत्राटदार कंपनीला पात्र ठरविले. निविदा प्रक्रिया मुख्यालयी अकोल्यात न राबविता पुण्यात घेण्यात आली.

माघार घ्या -
डाटा एन्ट्री ऑपरेटरचा पुरवठा करीत असलेल्या कंपनीचे व पशुधन विकास मंडळातील वरीष्ठांचे साटे-लोटे असून, यामध्ये कोट्यावधीची डील आहे. मला या प्रक्रीयेतून माघार घेण्याचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सल्ला दिला. हा कंत्राट सोडून बोल, अशी ऑफरही होती. प्रकरण न वाढविता तडजोड करून मोकळा हो, असा इशारा देण्यात आला. मला कंत्राट नको, तडजोड तर नकोच नको. सर्वांना संधी मिळावी यासाठी माझी लढाई आहे. यासाठी मी न्यायालयाचे दार ठोठावणार आहे.
- विवेक देशमुख, संचालक, श्री साई ई-सर्व्हिसेस, अकोला.

पारदर्शक ई- निविदा -
ई-निविदा अत्यंत पारदर्शक कार्यपद्धतीने होणारा कार्यक्रम आहे. ई-निविदेमध्ये कोणतीही व्यक्ती नियम व अटी पुर्ण करणाऱ्या व्यक्तीला ते टेंडर मिळत असते. आमचे सर्व कागदपत्रे तपासणीसाठी खुले आहेत. त्यांनी स्पर्धात्मक कार्यपद्धतीत सहभाग घ्यावा.
- कांतीलाल उमप, आयुक्त पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Continuous contract for Maharashtra Livestock Development Board for one company