तलावांवर देशी-विदेशी पक्ष्यांची झुंबड

तलावांवर देशी-विदेशी पक्ष्यांची झुंबड
तलावांवर देशी-विदेशी पक्ष्यांची झुंबड

नागपूर - विदर्भ देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण झाले आहे. यंदा वाढलेल्या थंडीमुळे पक्ष्यांची गर्दी सर्वच तलावांवर आहे. यामुळे पक्षिप्रेमींची पावले पक्षी निरीक्षणासाठी पाणवठ्याकडे वळत आहेत. विदर्भातील महत्त्वाच्या नद्या, तलाव व इतर पाणथळांची ठिकाणे या खास पाहुण्यांनी गजबजून गेली आहेत. मात्र, नागपूर जिल्ह्यातील तलावांवर पाणी नसल्याने स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्याने तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे. थंडीने उशिरा हजेरी लावल्याने यंदा विदेशी पक्ष्यांचे उशिरा आगमन झाले. सध्या थंडीचा कडाका असल्याने पक्षिप्रेमींना पक्षी निरीक्षणासाठी उत्तम संधी मिळाली आहे. सोन टिटवा, तणई, काळ्या पोटाचा सूरय, राजहंस, गजरा, परी, सरग, चिमण शेंद्य्रा, मोंटेग्यूचा भोवत्या, लहान रेव टिटवा, पाण टिवळा, मोठा पाणलावा, छोटा टिवळा, जलरंक, तपकिरी डोक्‍याचा कुरव, पल्लासची केगो, गंगा पाणलावा, शेंडी बदक यांचे अमरावती जिल्ह्यातील नलदमयंती सागर, केकतपूर, दस्तापूर, शेवती, सूर्यगंगा, घातखेड, पोहरा, मालखेड, सावंगा, इंदला, राजुरा व छत्री अशा 54 जलाशयांत दर्शन झाले. मेळघाट व पोहरा मालखेड राखीव जंगल परिसरात कृष्ण थीरथिरा, नीलय, निलांग चाष, राखी डोक्‍याची लिटकुरी, वरटी पाखरू हे रानपक्षी दिसल्याचे यादव तरटे पाटील यांना सांगितले.

गोंदिया, भंडारा व नवेगाव तसेच अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा, महान पिंजर, वाशीम जिल्ह्यातील एकबुर्जी, यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती, इसापूर व बेंबळा प्रकल्पातील जलाशय स्थानिक पक्षिमित्रांनी स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली आहे.

सुरक्षित वातावरणाचा शोध
ऋतूनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता, थंडीत जलाशय गोठल्याने खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्‍यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे भारतात विविध देशांतून पक्षी स्थलांतर करतात. भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, मध्य आशिया, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, लद्दाख, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागांतून आपल्याकडे पक्षी येतात, असेही यादव तरटे म्हणाले.

नागपूर जिल्ह्यात विदेशी पक्ष्यांची पाठ
नागपूर येथील मिहान परिसरातील तेल्हारा तलाव, वडगाव, खापरी, पारडगाव स्थलांतरित पक्षी येतात. यंदा मात्र, जिल्ह्यातील अनेक तलावांत पाण्याची पातळी कमी झाल्याने देशी-विदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. यंदा पक्षी न आल्याने गणनाही अडचणीत आली आहे, असे पक्षिप्रेमी अविनाश लोंढे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com