पोलिस मुख्यालय परिसरातील जुगार अड्ड्यांवर धाड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

नागपूर - गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पोलिस लाइन टाकळी, पोलिस मुख्यालय परिसरातील तलावाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घातला. येथून पोलिस शिपायासह चौघांना अटक करण्यात आली. घटनास्थळावरून 72 हजार 750 रुपये जप्त करण्यात आले. पोलिस येत असल्याचे दिसताच अनेक पोलिस कर्मचारी पळून गेल्याची चर्चा परिसरात आहे.

सुरेंद्रप्राद तिवारी, रा. अवस्थीनगर असे पोलिस शिपायाचे नाव असून, त्याच्यासह निवृत्त पोलिस शिपाई श्‍यामसुंदर मिश्रा, इसराईल इस्माईल पठाण, रा. जाफरनगर यांनाही अटक करण्यात आली. तलावाजवळ वृक्षाच्या सावलीत मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती सदरचे सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच गिट्टीखदान पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

पोलिस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर, चौघांना पाठलाग करून पकडण्यात आले. घटनास्थळावरून 72 हजार 750 रुपये रोख जप्त करण्यात आले. गिट्टीखदान पोलिसांनी मुंबई जुगार कायदा 12 अन्वये गुन्हा नोंदवून चौघांनाही अटक केली.

पोलिसांचाच आश्रय!
बऱ्याच काळापासून पोलिसच येथे जुगार खेळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांचाच आश्रय असल्याने शहराच्या विविध भागांतील पट्टीचे जुगार खेळणारे येथे येतात. शहरातील विविध ठाण्यांत नियुक्त असलेले जुगारप्रेमी कर्मचारीही नियमित येथे येत असतात. बरेचदा एक-एक डावही लाखच्या घरात जात असल्याचे बोलले जाते. शुक्रवारीसुद्धा जुगार ऐन भरात असतानाच कारवाई करण्यात आली. परंतु, पोलिसांच्या हाती केवळ 72 हजार 750 रुपयेच लागल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.