रोगांमुळे हजारो हेक्‍टरवरील धानपीक नष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

गडचिरोली - ऐन शेवटच्या हंगामात धानावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हातील हजारो हेक्‍टर धानपीक खराब झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्‍या, मध्यम व जड प्रतीच्या धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानाचा निसवा थांबला. त्यामुळे शेकडो हेक्‍टर शेतातील धानपीक करपले. या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे.

गडचिरोली तालुक्‍यातील गोगाव, अडपल्ली, साखरा, पोर्ला, दिभणा, जेप्रा, राजगाटा, महादवाडी, कुऱ्हाडी यासह अमिर्झा, धुंडशिवणी परिसरातील धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने निसवा थांबला व पीक करपले. रोगग्रस्त पिकांवर कीटकनाशकांची दुबार-तिबार फवारणी करूनही धानपीक योग्य स्थितीत आले नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती चामोर्शी, धानोरा, मुलचेरा तालुक्‍यातही उद्‌भवली आहे.

यंदा पाऊस समाधानकार झाल्याने शेतकऱ्यांना धानाचे पीक चांगले होईल, अशी आशा होती परंतु, रोगांनी त्यांचा अपेक्षाभंग झाला. शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्चही निघण्याची आशा नसल्याने शेकडो शेतकऱ्यांपुढे कर्जाची परतफेड करण्याची समस्या निर्माण झाली आहे.

मागील दोन वर्षे सतत दुष्काळाने पीक झाले नाही. त्यामुळे यंदाही चांगले पीक असताना रोगाचा फटका बसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील नुकसानग्रस्त धानपिकाचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागाने किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर मोठ्या प्रमामात फवारणीसुद्धा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पीक वाचवता आले नाही, अशी खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.