चिमुकल्यांभोवती मधुमेहाचा फास! 

केवल जीवनतारे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

लठ्ठपणाकडे जाण्याचा हा मार्ग... 
- दोन तास टीव्ही बघणारी मुले ः लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण 12 टक्के 
- चार तास टीव्ही बघणारी मुले ः लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण 30 टक्के 
- पाच तास टीव्ही बघणारी मुले ः लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण 32 टक्के 

नागपूर : "चिऊ ये.. दाणा खा.. पाणी पी अन्‌ भुर्र उडून जा', अशी कथा सांगत आई आधी चिमुकल्यांना भात, भाजी, पोळीचा घास भरवायची. आता ताटातील भात, भाजी, पोळी हरवली अन्‌ पिझ्झा, बर्गर, जंक फूड त्याजागी आले. याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. चिमुकली मुले नको त्या वयात लठ्ठ होऊ लागली आणि कधीही न होणाऱ्या आजारांच्या विळख्यात सापडली. मधुमेहासारख्या आजारांचा विळखा मुलांना पडतो आहे. एकूण मधुमेहग्रस्तांमध्ये दोन ते तीन टक्के मुले या आजाराने ग्रस्त आहेत. अवघ्या नऊ आणि 11 महिन्यांच्या बाळांनाही मधुमेह झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. 

"डायबेटिज केअर ऍण्ड रिसर्च सेंटर'तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. लहान मुलांमध्ये "टाईप-1' डायबेटिस आढळतो. पाच ते 14 वर्षे वयोगटांतील मुलांना या टाईपची बाधा होते. यात ही मुले इन्सूलिनशिवाय राहू शकत नाहीत. इन्सूलिन तयार करणाऱ्या "बिटा'नामक कोषिका नामशेष होतात किंवा संसर्ग आणि प्रतिरोधक शक्तीमुळे स्वतःच त्या कोषिका उद्‌ध्वस्त केल्या जातात. परंतु, आता या मुलांमध्ये "टाईप-2' मधुमेहदेखील आढळून येत आहे, असे "डायबेटिज केअर ऍण्ड रिसर्च सेंटर'चे संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकापासून मुलांच्या मधुमेहावर सर्वेक्षण सुरू आहे. अडीच हजारांवर मुलांची तपासणी करण्यात आली. 2006 मध्ये 7.1 टक्के मुले लठ्ठ असल्याचे आढळले; तर 13. 1 टक्के मुलांमध्ये अधिक वजन वाढत असल्याचे सर्वेक्षणात आढळले. पुढे मात्र, 2016 मध्ये यात वाढ झाली. केवळ 1200 मुलांमध्ये 8.4 टक्के मुले "लठ्ठ' असल्याचे आढळले, तर, 16.5 टक्के मुले सरासरी वजनापेक्षा अधिक वजनाचे आढळले. शंभर मधुमेहींमध्ये चक्क दोन ते तीन मधुमेही मुले आढळून येत आहेत, ही अतिशय गंभीर बाब असल्याचे डॉ. गुप्ता म्हणाले. मधुमेह आनुवंशिक आहे. अनेक स्त्रियांकडून तो पुढच्या पिढीला भेट मिळतो. 

एकूण 2300 मुलांचे सर्वेक्षण 
- सरासरी वजनापेक्षा जास्त वजन 
- दशकापूर्वीची आकडेवारी ः 7.1 टक्के-13.1 टक्के 
- सध्याची आकडेवारी ः 8.4 टक्के - 16.4 टक्के 

लठ्ठपणाकडे जाण्याचा हा मार्ग... 
- दोन तास टीव्ही बघणारी मुले ः लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण 12 टक्के 
- चार तास टीव्ही बघणारी मुले ः लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण 30 टक्के 
- पाच तास टीव्ही बघणारी मुले ः लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण 32 टक्के 

मुलांमधील खेळण्याची वृत्ती कमी झाली आहे. सोफ्यावर बसून हाती रिमोट घेत नजर टीव्हीवर असते. यामुळे या मुलांना "काउच पोटॅटो सिंड्रोम' हे व्यसन जडते, असे म्हणता येईल. हे लठ्ठपणाच्या जवळ जाण्याचे निमंत्रण आहे. अशा वागण्यामुळे मधुमेह त्यांच्या साथीला नक्कीच येईल. चिमुकल्यांना या आधुनिक आहार संस्कृतीपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी जबाबदारी स्वीकारावी. 
-डॉ. सुनील गुप्ता, संचालक, "डायबेटिज केअर ऍण्ड रिसर्च सेंटर'