दिनेश भुतडा याला शरणागती पत्करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

नागपूर - आकोट येथे उघडकीस आलेल्या डब्बा व्यापार प्रकरणातील आरोपी दिनेश भुतडा याच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज रद्द करत त्याला शरणागती पत्करण्याचे आदेश मंगळवारी (ता. 5) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. पोलिसांनी त्याच्यावर 15 जुलैपर्यंत वा शरण येईस्तोवर कुठलीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देशदेखील न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी दिले.

अकोला जिल्ह्यातील आकोटमध्ये नरेश आणि दिनेश हे भुतडा बंधू सट्टा चालवायचे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी 1 जून 2016 रोजी कस्तुरी कमोडिटीज ऍण्ड शेअर्स या भुतडा यांच्या प्रतिष्ठानावर छापा टाकला. या वेळी भुतडा बंधू डब्बा व्यापार करीत असल्याचे उघडकीस आले. यानंतर अकोला पोलिसांनी नागपूर पोलिसांची मदत घेत भुतडा बंधूंविरुद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणी अटक होण्याची शक्‍यता असल्याचे लक्षात येताच दिनेश भुतडा याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात अपील केले.

दिनेश भुतडा हा नोंदणीकृत शेअर्स व्यापारी आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तो पोलिसांना तपासात सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. मात्र, प्रकरणातील इतर काही बाबी लक्षात घेत न्यायालयाने भुतडा याला शरणागती पत्करण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.