जिल्ह्यातील आरोग्य विभाग प्रभारींच्या भरवशावर

जिल्ह्यातील आरोग्य विभाग प्रभारींच्या भरवशावर

भंडारा - पावसाने दडी मारल्याने उकाडा वाढला आहे. यामुळे विषाणूजन्य व कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणारा आरोग्य विभागाचा डोलारा कोलमडला आहे. आरोग्याची सुविधा देण्याची जबाबदारी असणाऱ्या विभागातील फोलपणा उघडकीस येत आहे. 

जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रभारी पदाचा अतिरिक्त भार सोपविला आहे. यातील अनेक पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले. अतिरिक्त प्रभार वैद्यकीय अधिकारी तथा प्रशिक्षण पथकाचे डॉ. प्रशांत उईके यांच्याकडे सोपविण्यात आला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यांतील अनेक पदे ही मागील १० वर्षांपासून रिक्त आहेत. वर्ग २ अधिकाऱ्यांची १३ पदे रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचारी ३७ पदे, अतांत्रिक पदे ९० रिक्त आहेत. पदोन्नतीने भरण्याची २१ पदे अद्याप भरण्यात आलेली नाही. सोबतच अन्य प्रवर्गांतील १० पदे रिक्त आहेत. येथे सर्व पदे मिळून ९५६ पदे मंजूर असून, ८६० पदे भरण्यात आलेली आहेत. तर १७१ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीत ११२ पदे मंजूर असून, ९१ भरलेली असून २१ पदे रिक्त आहेत. येथील कामे प्रभारींवर सुरू आहेत. हिवताप व हत्तीरोग विभाग एकाच दावणीला बांधण्यात आले आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी हे पद २००७ पासून रिक्त आहे. तिथे आर. डी. झलके यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. या विभागात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३३ तर प्रयोगशाळा तंत्रज्ञाची १६ पदे रिक्त आहेत. जिल्हा हत्तीरोग अधिकारी हे पदही रिक्त असून, येथे क्षेत्र कार्यकर्ता ही ५० पदे रिक्त आहेत.

रुग्णालये फुल्ल

जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांचे थैमान सुरू आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालये फुल्ल झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात काही दिवसांपासून थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. वातावरण बदलामुळे तसेच व्हायरलमुळे रुग्णांना टायफॉईड, मलेरिया, कावीळ अशा आजारांची साथ सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com