पाच हजारांवर कर्मचारी विनंती बदलीच्या प्रतीक्षेत

Doctor
Doctor

नागपूर - मार्चपासून तर जून-जुलै हा शासकीय आरोग्य विभागातच नव्हेतर सर्वच शासकीय यंत्रणेतील बदल्यांचा काळ असतो. मात्र अलीकडे कधी कोणाची कोणत्या ऋतूमध्ये बदली होईल हे सांगता येत नाही. सार्वजनिक आरोग्य विभागात यावर्षी केवळ विनंती बदल्या होतील, असे सांगण्यात आले. परंतु राज्यातील एकाही कर्मचाऱ्याला विनंती बदली देण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुमारे ५ हजारांवर विनंती बदल्यांना थांबा लावला आहे. विनंती बदली मागणाऱ्या संवर्गात विशेषत्वाने लिपिक, सांख्यिकी कर्मचाऱ्यांसह परिचारिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

२०१८ या वर्षाच्या प्रारंभीच सरकारने सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांकडून बदल्यांसाठी विनंती अर्ज भरून घेण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागापासून तर सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीही इच्छित ठिकाणी विनंती बदली मिळावी यासाठी अर्ज केला. सार्वजनिक आरोग्य विभागात १० ते १२ हजारांवर परिचारिका कार्यरत आहेत. अनेक परिचारिका शहरांपासून दूर नक्षल भागासह अतिदुर्गम भागात वर्षानुवर्षे सेवा देत आहेत.

वर्षानुवर्षे घरापासून दूर राहून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले लिपिक, सांख्यिकी कर्मचारी तसेच इतरही कर्मचाऱ्यांनी यावर्षी इच्छित शहरात बदली मिळेल या आशेवर विनंती अर्ज सादर केला. नागपूर विभागातून सुमारे ११०० परिचारिकांसह इतर कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केला असून राज्यात विनंती बदली अर्ज सादर करणाऱ्यांची संख्या ५ हजारांच्या घरात आहे. मात्र यावर्षी सरकारने अफलातून बदली धोरण राबवले. विनंती अर्ज मागवून या बदल्यांना डावलून प्रशासकीय बदल्यांचा खेळ सुरू केला. त्याअंतर्गत शेकडो वैद्यकीय अधिकाऱ्यांसह, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. बदलून गेलेले अनेकजण पुन्हा त्याच जागेवर परतही आले, मात्र विनंती बदली मागणारे अद्याप आहेत त्याच ठिकाणी आपली सेवा देत आहेत. यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष भडकला आहे.

पावसाळ्यातही बदली धोरण  
राज्यात पाच हजारांवर कर्मचारी विनंती बदलीच्या प्रतीक्षेत असताना, प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फारुखी यांना ऐन पावसाळ्यात पदोन्नती देण्यात आली. अकोला येथे ते आरोग्य उपसंचालक पदावर बढतीने रुजू झाले. विशेष असे की अवघ्या दीड महिन्यापूर्वी ते मनोरुग्णालयात कायम रुजू झाले होते, तसेच डॉ. पद्‌मजा जोगेवार असो की प्रशासकीय अधिकारी श्रीमती बाणिक; यांच्यावरही शासनाने अन्याय केला. अलीकडे आरोग्य विभागात बदलीचा मोसम वर्षभर सुरू असतो, यामुळे विनंती बदली अर्ज असलेल्या कर्मचाऱ्यांनाही इच्छित शहरात बदली देण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागात जोर धरत आहे. यासंदर्भात आरोग्य संचालक यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी बैठकीत असून नंतर संपर्क साधतो असे उत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com