चिकनगुनियाच्या रुग्णांत दुपटीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

नागपूर - महाराष्ट्रात गेल्या साडेतीन वर्षांत 1,013 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले असून गेल्या सात महिन्यांत 333 रुग्णांमध्ये या आजाराचे विषाणू आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीचा विचार केल्यास गेल्या सात महिन्यांत चिकनगुनियाच्या रुग्णांत दुपटीने वाढ झाल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे दिल्लीत थैमान घातल्यानंतर राज्यातही चिकनगुनियाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी साडेतीन वर्षांत डेंग्यूने 21 हजार रुग्णांना डंख मारला, यातील 317 रुग्ण मृत्युमुखी पडले. 

चिकनगुनियाने प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून यापूर्वी 1965, 1973, 1983 व 2000 मध्ये राज्यात उद्रेक झाला होता. संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणा चिकनगुनियाने त्रस्त झाली होती. घरोघरी चिकनगुनियाचे रुग्ण दिसून येत होते. गेल्या दीड दशकात चिकनगुनियाने रुग्णांची अल्प प्रमाणात नोंद होत गेली. परंतु, आरोग्य यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा चिकनगुनियाने तोंड वर केल्याचे आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना आरोग्यसेवा सहसंचालक पुणे कार्यालयाने दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे. 2013, 2014, 2015 या तीन वर्षांत 680 रुग्णांना चिकनगुनियाची लागण झाली. मात्र, गेल्या सात महिन्यांत 1 जानेवारी ते जुलैअखेपर्यंत 333 चिकनगुनियाचे रुग्ण राज्यातील विविध भागांत आढळून आले. गेल्या तीन वर्षांत आढळलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत गेल्या सात महिन्यांत आढळून आलेल्या रुग्णांच्या संख्या निम्म्याच्या जवळपास आहे. 2013 मध्ये 251, 2014 मध्ये 222, 2015 मध्ये 207 रुग्णांची नोंद झाली. परंतु, मागील सात महिन्यांत 333 रुग्णांची नोंद चिकनगुनियाच्या रुग्णांत दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट करीत आहे. 2013 मध्ये डेंग्यूचे 5 हजार 610, 2014 मध्ये 8573, 2015 मध्ये 5119 रुग्ण आढळले, तर गेल्या सात महिन्यांत 1778 रुग्णांची नोंद करण्यात आली. डेंग्यूमुळे 2013 मध्ये 138, 2014 मध्ये 144, 2015 मध्ये 33 जण दगावले. मागील सात महिन्यांत दोघांचा डेंग्यूने बळी घेतला. यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवले असतानाच चिकनगुनियाचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे उभे दिसून येत आहे. 

Web Title: Doubling the chikungunya patients