प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा : डॉ. दीपक सावंत

प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा : डॉ. दीपक सावंत

महाआरोग्य मेळावा : दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप

भंडारा : "आरोग्य आपल्या दारी' ही शासनाची भूमिका आहे. आरोग्य विभागाने आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. ते जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने आयोजित महाआरोग्य मेळावा व रक्तदान शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ऍड. रामचंद्र अवसरे होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, उपसंचालक आरोग्यसेवा डॉ. संजय जयस्वाल, सहायक जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकाने व्यक्तिगत स्वच्छता राखल्यास आजाराची संख्या निश्‍चित कमी होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, हात स्वच्छ धुतल्यास निम्मे आजार कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

महिला रुग्णालयाच्या संदर्भात बोलताना पालकमंत्री म्हणाले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीकडे हा विषय आहे. राज्यात जिल्हा परिषदांची आचारसंहिता असल्यामुळे हा विषय सध्या प्रलंबित असला, तरी पुढील एका महिन्यात महिला रुग्णालयाचा प्रश्‍न निकाली निघेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी बोलताना आमदार अवसरे यांनी पवनी येथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, महाआरोग्य मेळाव्यात तपासणी करणाऱ्या सर्व रुग्णांचा ते पूर्ण बरे होईपर्यंत पाठपुरावा ठेवला जाईल.

या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 7 नोव्हेंबर 2016 ते 27 नोव्हेंबर 2016 या दरम्यान दिव्यांग वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 391 लाभार्थी पात्र ठरले आहे. कार्यक्रमात अवयवदान अभियानात योगदान देणारी संस्था, मरणोपरांत नेत्रदान करणाऱ्या रुग्णाचे नातेवाईक व अवयवदान संमत्तिपत्र देणारे भय्यालाल निमजे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविशेखर धकाते यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी केले. या वेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com