ठिबकचे संच लावण्यापूर्वी घ्यावी लागणार मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

नागपूर - विदर्भ सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना कृषी विभागाची पूर्व मंजुरी घ्यावी लागेल. मंजुरी न घेणाऱ्यांना यापुढे अनुदान न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फटका गेल्या वर्षीच्या शेकडो शेतकऱ्यांना बसणार आहे. 

नागपूर - विदर्भ सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना कृषी विभागाची पूर्व मंजुरी घ्यावी लागेल. मंजुरी न घेणाऱ्यांना यापुढे अनुदान न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फटका गेल्या वर्षीच्या शेकडो शेतकऱ्यांना बसणार आहे. 

पाण्याचा काटकसरीने वापर, उपलब्ध पाण्यात अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राज्य सरकारने ठिबक आणि तुषार सिंचन योजना सुरू केली. दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला स्वत:चे पैसे खर्चून करून ठिबक आणि तुषार संच खरेदी करावे लागत होते. त्यानंतर ते कृषी विभागाकडे त्याचे देयक व प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवित होते. त्याला कृषी विभागाच्या मंजुरीनंतर अनुदान मिळत होते. हीच पद्धत ही योजना सुरू झाल्यापासून सुरू होती. त्यामुळे बरेच शेतकरी ठिबक व तुषार संच स्वत:च्या पैशातून खरेदी करीत होते. त्यामुळे यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या अधिक व त्यासाठी अनुदान कमी मिळत होते. परिणामी शेतकऱ्यांना दोन-दोन वर्षे लोटूनही अनुदान मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. एकट्या नागपूर विभागाचा विचार केल्यास 26 कोटी 83 लाख रुपयांचे अनुदान थकीत आहे. यासंबंधीचे वृत्त "सकाळ‘ने प्रकाशित केले. त्यानंतर राज्य सरकारने नुकताच ठिबक व तुषार सिंचन योजनेचे थकीत अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भातील परिपत्रक काढले. परंतु, ते काढताना योजनेच्या निकषात बदल केला. त्यानुसार आता या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला कृषी विभागाची मंजुरी घ्यावी लागेल. जेवढ्या शेतकऱ्यांना मंजुरी मिळाली असेल तेवढ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आधी संच खरेदी करून नंतर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविणारे शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील.

Web Title: Drip obviously set to take sanctions