बाळंतिणीला भरउन्हात सोडून चालकाचा पळ 

मनोहर बोरकर
शनिवार, 22 एप्रिल 2017

एटापल्ली - गरोदर मातेला रस्त्यात सोडून रुग्णवाहिकेच्या चालकाने पळ काढल्याची आलापल्लीतील घटना ताजी असतानाच पेंढरी येथील सरकारी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला नवजात बाळासह घरी न सोडता रुग्णालयाने दिलेल्या वाहनाच्या चालकाने भरदुपारी बारा वाजता रस्त्यातच सोडून दिले. बाळासह स्वतःचा उन्हापासून बचाव करण्यासाठी अखेर या बाळंतिणीला रस्त्यालगच्या झोपडीचा आसरा घ्यावा लागला. 

एटापल्ली - गरोदर मातेला रस्त्यात सोडून रुग्णवाहिकेच्या चालकाने पळ काढल्याची आलापल्लीतील घटना ताजी असतानाच पेंढरी येथील सरकारी रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेला नवजात बाळासह घरी न सोडता रुग्णालयाने दिलेल्या वाहनाच्या चालकाने भरदुपारी बारा वाजता रस्त्यातच सोडून दिले. बाळासह स्वतःचा उन्हापासून बचाव करण्यासाठी अखेर या बाळंतिणीला रस्त्यालगच्या झोपडीचा आसरा घ्यावा लागला. 

शशिकला धनिराम कोडापे असे त्या महिलेचे नाव असून ती एटापल्ली तालुक्‍यातील गोटेटोला येथील रहिवासी आहे. शशिकलाचे प्रसूतीचे दिवस पूर्ण झाल्याने बुधवारी (ता.19) दुपारी तिच्या नातेवाइकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जारावंडी येथे भरती केले. मात्र, सायंकाळी सात वाजेपर्यंत एकही महिला आरोग्य कर्मचारी रुग्णालयात आल्या नाही. त्यामुळे डॉ. हिचामी यांनी शशिकलाला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाने जारावंडीवरून गडचिरोलीकडे घेऊन जात असताना काही अंतरावरच तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यामुळे पेंढरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रात्री शशिकलाचे नॉर्मल बाळंतपण झाले. दुसऱ्या दिवशी डॉक्‍टरांनी शशिकलाला दवाखान्यातून सुटी दिली. सुटीची 

कार्यवाही करता-करता अकरा वाजले. त्यानंतर माता व नवजात बाळाला गोटेटोला येथे पोचवून देण्यासाठी रुग्णवाहिकेअभावी रुग्णालयाने एक खासगी वाहन दिले. मात्र, त्या वाहनाचा चालक नवजात बाळासह मातेला भरदुपारी जारावंडीत रस्त्यावर सोडून पसार झाला. जारावंडीपासून गोटेटोला गाव लांब असल्याने जायचे कसे असा प्रश्‍न शशिकलाला पडला. मात्र, कोणताही मार्ग निघाला नाही किंवा कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीचा आधार तिने घेतला. बाळाला खाली झोपवून चिंताग्रस्त माता दुपारी बारा वाजतापासून चार वाजेपर्यंत ताटकळत राहिली. लग्नसराईचे दिवस असल्याने गावाकडे जाण्यासाठी एकही वाहन मिळाले नाही. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे बाळंत महिलेवर भरउन्हात रस्त्याच्या कडेला थांबण्याचा प्रसंग ओढवला. 

काही दिवसांपूर्वीच आलापल्ली येथील बसस्थानक परिसरात अशीच घटना घडली. दुर्गम गावातून प्रसूतीसाठी अहेरी येथे नेत असताना वाहन चालकाने तिला रस्त्यात उतरवून पळ काढला. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला रुग्णालयात पोहोचवून दिले. ही घटना ताजी असतानाच आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गोटेटोल्याच्या आदिवासी महिलेला नाहक त्रास सहन करावा लागला. सरकारी रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही गरोदर माता किंवा गंभीर आजारी रुग्णांना देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जारावंडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हिचामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शशिकला रुग्णालयात आली त्यावेळी आरोग्य कर्मचारी हजर नसल्याने आपण त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. 

अखेर गावकरी धावले 
वाहन चालकाने रस्त्यात सोडून दिल्यानंतर भरउन्हात झोपडीचा आसरा घेतलेल्या शशिकलाला गोटेटोला येथे जाण्यासाठी दिवसभर कुठलेच साधन मिळाले नाही. घटनेची माहिती जारावंडी येथील राजू कोडापे व अन्य काही गावकऱ्यांना मिळाली. त्यांनी गावातून वर्गणी गोळा केली. त्यानंतर खासगी वाहन भाड्याने करून शशिकला व तिच्या नवजात बाळाला गोटेटोला येथे पोचवून देण्यात आले. नागरिक मदतीला धावल्याने एका मातेवर ओढवलेला प्रसंग दूर झाला.