शिक्षणासाठीचा प्रवास होणार सुकर

शिक्षणासाठीचा प्रवास होणार सुकर

मैत्री परिवाराने दिली साथ - साठ शाळांमधून दीडशे विद्यार्थ्यांची निवड 

नागपूर - मानेवाडा परिसरातील राजनचे घर नि शाळा यांचे अंतर तीन किलोमीटरचे. पाऊण तास शाळेत जाण्यात तर पाऊण तास घरी येण्यात खर्च व्हायचा. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सायकल खरेदी करणे शक्‍य नव्हते. मैत्री परिवाराने दिलेल्या सायकलने शिक्षणासाठीचा प्रवास सुकर होईल, असा विश्‍वास राजनने व्यक्त केला. सायकल मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. 

मैत्री परिवारातर्फे नागपूर शहरातील दीडशे विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. नागपुरातील साठ शाळांमधून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अंध विद्यालयाजवळील बीआरए मुंडले सभागृहात रविवारी (ता. ७) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मैत्री परिवारतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीकरिता गेल्या तीन वर्षांपासून ३०० विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना राबविण्यात येत आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. या कार्यक्रमाला बार्टीचे संचालक राजेश ढाबरे, लोहमार्ग पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त दीपाली मासीरकर, मोटिव्हेटर डॉ. नरेंद्र भुसारी आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी पोलिस अधीक्षक संदीप तामगाडगे, मैत्री परिवारचे संजय भेंडे, प्रमोद पेंडके, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नरेंद्र भुसारी आणि संदीप तामगाडगे यांची भाषणे झाली. 

मैत्रीच्या वतीने अलीकडेच आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. दोन गटांत झालेल्या या स्पर्धेत ‘पर्यावरण’ हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला. पहिल्या फेरीत १,९०० विद्यार्थी सहभागी झाले. यातून २३६ विद्यार्थी अंतिम फेरीत पोहोचले. ३१ जुलैला ‘विष्णूजी की रसोई’ येथे अंतिम फेरी झाली. यातील विजेत्यांनाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दत्तक योजनेचे धनादेश व सायकलींचेही वाटप यावेळी झाले. संचालन माधुरी यावलकर यांनी केले, तर आभार प्रमोद पेंडके यांनी मानले. सिसोंग रियांग, सलोनी साठवणे, शांती मेसखा, जान्हवी काळे, दुर्गा शाहू, प्रियांका सहारे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. 

समाज आपली दखल घेईल, असे काम विद्यार्थ्यांनी करावे. आयुष्य सगळेच जगतात; पण आपले कार्य समाजासाठी आदर्श ठरले पाहिजे.

- राजेश ढाबरे 

आयुष्यात समस्या येतात, परंतु त्या सोडविण्यासाठी उपाय शोधले पाहिजेत.

- शैलेष बलकवडे

अशा कार्यांमध्ये प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. विद्यार्थ्यांनीदेखील मदतीची जाणीव ठेवायला हवी. 

- दीपाली मासीरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com