तीन महिन्यांत देशात इलेक्‍ट्रिक वाहतूक - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

नागपूर - शहरातील प्रदूषणावर मात करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्‍ट्रिकवरील (बॅटरी) वाहनांवर भर देण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञान सर्व वाहनांच्या कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत देशात बस, रिक्षा, टॅक्‍सी इलेक्‍ट्रिकवर धावतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे शनिवारी केली. एक मेपासून नागपुरातून इलेक्‍ट्रिक टॅक्‍सीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करणार आहे.

महापालिका व एलिट टेक्‍नोमीडियातर्फे आयोजित "स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी' शिखर संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर नंदाताई जिचकार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, उबर इंडियाच्या संचालिका श्वेता कोहली आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ""देशात लिथिअम बॅटरीवर वाहने चालविण्यास पुढाकार घेण्यात आला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली. बॅटरीवर वाहतुकीमुळे पेट्रोल, डिझेलच्या आयातीवरील खर्चात कपात होणार असल्याने पंतप्रधानांनी यास हिरवा कंदील दाखविला आहे. टाटाने इलेक्‍ट्रिक बसचे मॉडेल तयार केले आहे. "एलएनजी' भविष्यातील इंधन राहणार असून, सर्व प्रकारची जहाजे यापुढे त्यावर चालविण्याचा प्रयत्न आहे. नागपुरात एक मेपासून इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी धावणार आहे. ते नागपूर देशातील पहिलेच शहर ठरेल.
"स्मार्ट सिटी'त सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर आवश्‍यक आहे. नागपूर महापालिकेने "महाजनको'ला सांडपाणी विकून उत्पन्नाचा मार्ग शोधला. "स्मार्ट सिटी' करायचे असेल, तर उत्पन्न वाढणे आवश्‍यक आहे. त्यामुळे लंडन स्ट्रीट प्रकल्पातून महापालिकेला एक हजार कोटींचे उत्पन्न प्राप्त होईल, असा दावा त्यांनी केला.

"मल्टिमॉडेल हब'साठी नधी
"स्मार्ट सिटी' प्रकल्पातील यशासाठी योग्य अंमलबजावणी व राजकीय इच्छाशक्तीची गरज व्यक्त करताना त्यांनी मेट्रो रेल्वे, मोठी रेल्वे, बस स्थानक एकाच भागातून सुरू करण्यासाठी "मल्टिमॉडेल हब'वर भर दिला. मल्टिमॉडेल हबसाठी केंद्र सरकार शहरांना निधी देणार असल्याचेही गडकरी म्हणाले.