पूर्व विदर्भातील वीजयंत्रणा होणार ऊर्जावान

Mahapareshan
Mahapareshan

नागपूर - कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. पूर्व विदर्भातील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पारेषणच्या विकास आराखड्यात या उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. पाचही उपकेंद्र नागपूर जिल्ह्यात उभारण्यात येत असले तरी त्याचा लाभ विदर्भातील सर्व जिल्ह्यांना होणार आहे. 

कुही तालुक्‍यातील पाचगाव येथे २२०/३३ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येईल. त्यामुळे कुहीच्या परिसरातील गावांना योग्य दाबाने वीजपुरवठा होऊन कमी दाबाने वीजपुरवठ्याची समस्या निकाली निघणार असून टेक्‍सटाइल उद्योग आणि अन्य उद्योगांनाही याचा फायदा होईल. 

पारडी आणि मौदा उपकेंद्राअंतर्गत अनेक उद्योग आहेत. त्यांना गुमथळा फीडरवरून वीजपुरवठा होतो. भविष्यातील गरज लक्षात घेऊन कडोली येथे २२०/३३ केव्हीचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. काटोल-येनवा या भागात एमआयडीसी होऊ घातली आहे. त्यासाठी महावितरणच्या मागणीनुसार येनवा २२०/३३ केव्ही उपकेंद्र पारेषणतर्फे उभारण्यात येत असून त्याद्वारे कळमेश्वर आणि वरूड लाइनवरही वीजपुरवठा करता येईल. 

रोहना २२० केव्ही उपकेंद्र तसेच खापरखेडा उपकेंद्राच्या क्षमतावाढीमुळे या भागातील समस्या मार्गी लागेल. 

रामटेक तालुक्‍यात प्रस्तावित घोटिक उपकेंद्रामुळे अरोली, मनसर व भंडाऱ्यानजीकच्या भागाला दर्जेदार वीजपुरवठा होईल. कोलारी येथे १३२/३३ क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. तिथून भंडारा, मोखाबर्डी वाहिनीला वीजपुरवठा होणार असून १३२ केव्ही लिंकलाइन नागभीडपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपुरातील चिमूर तालुक्‍यातील भुयार आणि मोखाबर्डीला लाभ मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com