शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा तिसरा झटका 

चेतन देशमुख
सोमवार, 24 एप्रिल 2017

जून 2015, नोव्हेंबर 2016 व आता एप्रिल 2017 पासून सलग तिसऱ्यांदा वीजदरवाढ लागू झालेली आहे. ही वाढ शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहे.

एप्रिलपासून दरवाढ लागू; वीज ग्राहक संघटनेची माहिती 

यवतमाळ -  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने यावेळी सर्वाधिक दरवाढ कृषिपंप ग्राहकांवर लादली आहे. परिणामी, राज्यातील शेतकऱ्यांवर एप्रिलपासून तिसरी वीजदरवाढ लागू झाली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना न झेपणारी आहे. त्यामुळे शासनाने कृषिपंपांना सवलतीच्या दरात वीज द्यावी व नवे दर जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे. 

प्रथम जून 2015, नोव्हेंबर 2016 व आता एप्रिल 2017 पासून सलग तिसऱ्यांदा वीजदरवाढ लागू झालेली आहे. ही वाढ शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी आहे. आयोगाने एक नोव्हेंबर 2016 पासून चार टप्प्यांत दरवाढ लागू केली आहे. महावितरणने त्यानुसार एप्रिल 2017 पासूनच्या दराचे व्यापारी परिपत्रक लागू केले आहे. आयोगाने लागू केलेल्या दरातील वाढीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागेल, असा खुलासा महावितरणने केल्याचे होगाडे यांनी म्हटले आहे. जानेवारी 2015 पर्यंत सवलतीचे दर तीन अश्‍वशक्तीपर्यंत 55 पैसे तर त्यानंतर 85 पैसे प्रतियुनिट होते. ते आता 101 ते 131 पैसे प्रति युनिट झाले आहेत. विनामीटर शेतीपंपांच्या सवलतीच्या दरातही बदल झाला आहे. याशिवाय पुन्हा टप्प्याटप्प्याने एप्रिल 2018 व एप्रिल 2019 मध्ये दरवाढ होणार आहे. मे 2015 अखेरच्या सवलतीच्या दराच्या तुलनेत एप्रिल 2019 मधील कृषिपंपांचे दर दुप्पट ते तिप्पट होणार आहेत, अशी माहिती होगाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाव्दारे दिली आहे. 
 
कृषिपंपाची थकबाकी 17 हजार कोटींवर 
2018 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याची महावितरणची योजना आहे. सध्या कृषिपंपधारक शेतकऱ्याकडे 17 हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात औरंगाबाद 1,236 कोटी, जालना 882, अकोला 244, बुलडाणा 720, वाशीम 278, अमरावती 618, यवतमाळ 686, बारामती 712, सातारा 173, सोलापूर 2021, भिवंडी 138, चंद्रपूर 39, गडचिरोली 28, भंडारा 65, गोंदिया 39, धुळे 571, जळगाव 1,464, नंदुरबार 366, कोल्हापूर 94, सांगली 358, बीड 1,038, लातूर 670, उस्मानाबाद 834, नागपूर 73, वर्धा 93, हिंगोली 461, नांदेड 894, परभणी 587, नगर 2,123, मालेगाव 516, नाशिक 511 तर पुणे जिल्ह्याची 236 कोटी थकबाकी आहे. 

Web Title: energy cost increase farmers