अपंगांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही: आमदार बच्चु कडू

संजय सोनोने
रविवार, 3 सप्टेंबर 2017

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय दिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला.

शेगाव- राज्यातील अपंग बांधव अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. त्यांच्या शारीरिक असहाय्यतेमुळे त्यांना सक्षमरित्या जीवन जगता येत नाही. प्रशासनाकडून त्यांची अवहेलना केली जाते. शासनाकडून दिले जाणारे मानधनही तोकडे आहे. त्यामुळे अपंगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यात येवून मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आपण शासनाकडे केलेली आहे. १० सप्टेंबरपर्यंत शासनाने अपंगाच्या समस्या मार्गी लावून मानधनात वाढ न केल्यास ११ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चु कडू यांनी केले.

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय दिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला. यावेळी अपंगांना मार्गदर्शन करण्यातांना आमदार कडू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रामदास खोत, राज्य समन्वयक रामदास म्हात्रे, राजाभाऊ गोकुळआष्टमी, अभय पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख तथा प्रहार अपंग क्रांतीचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा संजय इंगळे, निलेश घोंगे, प्रहार महिला आघाडीच्या प्रांजली धोरण, युवराज देशमुख, अल्पेश भांड, राजु मसणे, किरण दराडे, विनोद पवार, गोलु ठाकुर, दत्ता पाकधाणे यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आमदार कडू म्हणाले की, अपंगांसाठी बऱ्याच योजना आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासिन धोरणांमुळे सदर योजनांची अंमलबजाणी प्रभावीपणे होत नाही. संजय गांधी निराधार योजनेतंर्गत अपंगांना ६०० रूपयांचे मानधन देण्यात येते. मात्र हे मानधन अत्यंत तोकडे असल्याने मानधनात वाढ करण्यात यावी, अपंगांच्या १९९५ च्या कायद्याची अंमलबजाणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आपला शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. १०ऑक्टोबर पर्यंत अपंगांच्या मानधनात वाढ करण्याचा अल्टीमेटम् आपण शासनाला दिलेला आहे. शासनाने वेळेच्या आत मानधनात वाढ न केल्यास ११ ऑक्टोबर पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अपंग बांधव आमरण उपोषणास बसणार असून आपणही या उपोषणात सहभागी होणार असल्याचे आमदार कडू यावेळी बोलतांना सांगीतले. यावेळी अपंगांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचे काम करणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. तसेच अपंगांच्या योजना, अपंग कायदा, शासन निर्णय, याची विस्तृत माहिती सांगणाऱ्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. यावेळी राज्यातील २ हजारावर अपंग बांधव व भगीनींची उपस्थिती होती.

Web Title: esakal news bacchu kadu mla news