विश्‍वास आणि धास्ती ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नागपूर  - दहा-बारा दिवस मतदारसंघ पिंजून काढत प्रचार करून थेट नागरिकांशी संपर्क साधणाऱ्या उमेदवारांचा आत्मविश्‍वास दांडगा असला तरी उद्या (मंगळवार) आपल्या खात्यात किती मते पडणार, याबाबत प्रत्येकाच्याच मनात धास्ती आहेच. शेवटच्या क्षणाला कुणाच्या बाजूने मतदारांचा कौल असेल, या विचाराने अनेकांनी देव पाण्यात ठेवले असतील, असे म्हणायलाही हरकत नाही. 

प्रभाग रचनेत अनेक मतदारसंघ मोठा झाला, काहींचा गड दुसऱ्या मतदारसंघात गेला, तर हीच रचना काहींच्या पथ्यावरही पडली. पण, प्रत्यक्ष प्रचारासाठी मैदानात उतरताना साऱ्याच उमेदवारांना घाम गाळावा लागला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचा प्रभाव असला तरी काही भागांमध्ये अपक्ष उमेदवाराचा वट चांगला असल्यामुळे मतदारांचे विभाजन होण्याची शक्‍यता आहे. अशा ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेच्या निवडणुकीतही प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. पण, मतदारांशी थेट संपर्क हा महत्त्वाचा अजेंडा सर्वच उमेदवारांनी राबविला. एका दिवसात दोन किंवा तीन महत्त्वाचे भाग फिरून, मतदारांशी संवाद साधून आपल्या बाजूने कौल ओढण्याचा प्रयत्न करावा लागला. मात्र, प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच उमेदवारांच्या आत्मविश्‍वासाची परीक्षा होणार आहे. रविवारी सायंकाळी प्रचार थांबला असला तरी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन अंदाज घेण्याची मोहीम सोमवारीसुद्धा कायम होती. 

मेहनत कामी येणार? 
उद्या (मंगळवार) सकाळी प्रभागातील अधिकाधिक मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोठ्या नेत्यांचा प्रभाव पडतो, उमेदवारांचा प्रचार कामी येतो की पक्ष आणि चिन्हाचा विचार न करता झोकून देणाऱ्याची मेहनत कामी येते, याचे उत्तर उद्या मतदार ईव्हीएमच्या माध्यमातूनच देतील, हे निश्‍चित.

Web Title: Faith and fear