पंतप्रधान मोदींना आत्महत्येस जबाबदार धरणाऱ्या शेतकऱ्यावर तिसर्‍या दिवशी अंत्यसंस्कार

family of farmer who committed suicide said prime minister is responsible
family of farmer who committed suicide said prime minister is responsible

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हे नोंद होत नाहीत व मदतीचे ठोस आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा पवित्रा घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील ग्रामस्थांसह शेतकर्‍याच्या नातेवाइकांनी घेतला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकर्‍यांचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनगृहातच होता. मात्र, गुरुवारी (ता. 12) महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार विजया धोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोलिस बंदोबस्तात राजुरवाडी येथे रवाना करण्यात आला.

शंकर चायरे या शेतकर्‍याने मंगळवारी (ता. दहा) सकाळी काकाच्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. या शेतकर्‍याने आत्महत्येस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून मृताच्या कुटुंबाला एक कोटीची मदत देण्याची मागणी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीसह नातेवाईक व ग्रामस्थांनी केली. मुख्यमंत्री आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही घेतला. त्यामुळे दोन दिवसांपासून मृतदेह शवविच्छेदनगृहातच होता. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी शवविच्छेदनगृहात भेट दिली. अधिष्ठाता व वरिष्ठ अधिकार्‍यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राजुरवाडी येथे भेट देऊन चायरे कुटुंबीयांचे सांत्वन केले. मात्र, यथोचित आर्थिक मदत व मृताच्या एका मुलीस शासकीय सेवेत नोकरी देण्याची हमी घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, या भूमिकेवर चायरे कुटुंबीय ठाम होते. राज्यमंत्री राठोड यांनी मृत शंकर चायरे यांच्या कुटुंबीयांचे व नातेवाईकांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. चायरे यांच्या मुलींचे शिक्षण, एका सदस्यास नोकरी, कुटुंबियास आर्थिक मदत या सर्व बाबींचा शासनस्तरावर विचार करून कुटुंबीयांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मदन येरावार यांच्याशी संवाद साधून चायरे कुटुंबीयांच्या भावना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचविल्या. मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री येरावार यांनीही चायरे कुटुंबीयांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मत राज्यमंत्री राठोड यांच्याकडे व्यक्त केले. शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य करण्याचा विश्वास देत शंकर चायरे यांचा मृतदेह प्रथम ताब्यात घेऊन शवविच्छेदनास परवानगी द्यावी व त्यांच्यावर रिवाजाप्रमाणे अंत्यंसंस्कार करावे, अशी विनंती राज्यमंत्री राठोड यांनी चायरे कुटुंबीयांना केली. त्यानंतर चायरे कुटुंबीयांनी उपस्थित नातेवाईक व काही संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला. त्यानंतर यवतमाळ येथे शवविच्छेदन करून सायंकाळी पाच वाजता शंकर चायरे यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. यानंतर पोलिस बंदोबस्तात रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह राजूरवाडी येथे नेण्यात आला. तिसर्‍या दिवशी गुरुवारी सायंकाळी सातदरम्यान मृतदेहावर राजुरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com