जिल्हाधिकारी कार्यालयावर टोमॅटो फेकल्याने 100 शेतकऱ्यांना अटक

farmer
farmer

बुलडाणा : शेतमालाला भाव नसल्यामुळे आधीच शेतकरी त्रस्त असतानांच राज्यात भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी सुध्दा हवालदिल झाला आहे. बाजारात भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकून देत आहेत. सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे दु.12 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर शेतकऱ्यांनी 2 ट्रॉली टोमॅटो फेकून आपला संताप व्यक्त केला. यावेळी रविकांत तुपकर व जवळपास 100 शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत सरकारचा निषेध केला.

रक्ताचे पाणी करत प्रचंड मेहनतीने शेतकरी आपली शेती पिकवितो, मात्र बाजारात पिकाला भाव न आल्याने त्यांच्या मेहणतीवर पाणी फिरविल्या जाते. मेहकर तालुक्यातील बोरी येथील संजाब आश्रु बचाटे या शेतकऱ्याने शेतातील वांगी व टोमॅटोला बाजारात विक्रीसाठी नेले, मात्र बाजारात या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतापलेल्या या युवा शेतकऱ्यांने शेतातील वांगी व टोमॅटोची झाडे अक्षरशा: कुऱ्हाडीने तोडून टाकली. या पार्श्वभूमिवर आज 26 मार्च रोजी शेतकऱ्यांनी 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात  दोन ट्रॉली टोमॅटो आणून लोकांना फुकट नेण्याचे आवाहन केले मात्र शेतकऱ्यांचा हा भाजीपाला कोणी फुकटही नेत नसल्याचे पाहून अखेर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो टाकून सरकारचा निषेध केला. 'स्वाभिमानी'च्या या आनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टोमॅटो चा अक्षरशः सडा पडला होता. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्ते रविकांत तुपकर व शंभर शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. 

यावेळी पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना तुपकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेले भाजपचे सरकार शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवत असले तरी या सरकारच्या कथणी आणि करणीमध्ये फरक आहे. मागील साडेतीन वर्षात शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांनी सिध्द करून दाखविले आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीला बगल देत या सरकारने कर्जमाफिला खोडा घातला, अदयाप बोंडअळीच्या अनुदाने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. बाजारात कोणत्याच पिकाला भाव नाही. त्यामुळे हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडून शेतकऱ्यांना नुसते गाजर दाखवित असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. कापूस, सोयाबीन, धान व ईतर पिकांना भाव नसल्याने मोठया आशेने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पिक घेतले. मात्र बाजारात या पिकांना अक्षरश: कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना कोबी, टमाटर, वांगी, मेथी व इतर भाजीपाला रस्त्यावर फेकुन देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज बाजारात आणलेला भाजीपाला फुकटात घेण्याचे लोकांना आवाहन केले. मात्र हा भाजीपाला कुणी फुकटही घेत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणुन रस्त्यावर फेकला व सरकारचा निषेध केला. मात्र येथेही पोलीसांनी शेतकऱ्यांची मुस्काटदाबी करुन हे आंदोलन चिरडुन टाकले व शेतकऱ्यांना अटक केली. सरकारच्या या हुकुमशाहीचा आम्ही निषेध करतो व सरकारने जर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविला नाही तर मंत्रालयात भाजीपाला फेकू असा इशारा तुपकर यांनी दिला. 

या आंदोलनात टोमॅटो उत्पादक शेतकरी मुधकर शिंगणे, स्वाभिमानीचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील, राणा चंदन, कैलास फाटे, भगवानराव मोरे, शे.रफीक शे.करीम,सतीश मोरे, दामोदर इंगोले, महेंद्र जाधव, निवृत्ती शेवाळे, नितीन राजपुत, अनिल वाकोडे, हरिभाऊ उबरहंडे,कडूबा मोरे, शे.सादिक, योगेश पायघन, अमिन खासब,अशोक मुटकुळे,सुधारक तायडे,सरदारसिंग इंगळे,मदन काळे,अमोल तेलंगरे,शशिकांत पाटील, दत्तात्रय जेऊघाले,शे.मुक्तार,मदन काळे,रामेश्वर परिहार,दिपक धनवे,भगतसिंग लोधवाळ गोटु जेऊघाले प्रेममसिंग धनावत,गणेश शिंगणे,डिंगाबर हुडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com