हजाराे शेतकरी पिककर्जासाठी ‘डिफॉल्टर’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

२०१६-१७ मध्ये पिककर्ज घेणाऱ्या परंतु त्यांचा भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंकांनी ‘डिफाॅल्टर’ ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी जुने कर्ज भरून नव्या कर्जाची मागणी केल्यास त्यांना पिककर्ज देण्यात येईल.
- आलाेक तारणीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, अकाेला

अकाेला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजनेचा लाभ मिळेल अशा अपेक्षेमुळे २०१६-१७ मध्ये घेतलेल्या पिककर्जाचा भरणा न करणाऱ्या जिल्ह्यातील हजाराे शेतकऱ्यांना यावर्षी बॅंकांनी ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे. त्यामुळे खरीपाच्या ताेंडावर पिककर्ज मिळावे यासाठी बॅंकांच्या चकरा मारणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.

राज्यात एप्रिल २००१ ते ३० जून २०१६ या कालावधीमधील शेतीकर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान’ योजना जाहीर केली. त्यानुसार दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी; तर त्यापेक्षा जास्त कर्ज असल्यास उर्वरित रक्‍कम एकरकमी (ओटीएस) भरून दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीच्या या याेजनेमध्ये २०१६-१७ मध्ये पिककर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला नाही. परंतु शासन त्यांच्या बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ देईल, अशी अपेक्षा २०१६-१७ मध्ये पिककर्ज काढलेले शेतकरी लावून बसले आहेत. परंतु यासंबंधी शासनाने काेणत्याच प्रकारचा धाेरणात्मक निर्णय न घेल्याने २०१६-१७ मध्ये पिककर्ज काढलेले शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत. परंतु कर्जमाफी मिळेल या अपेक्षेमुळे त्यांनी पिककर्जाचा भरणा सुद्धा केला नाही. त्यामुळे २०१६-१७ मध्ये काढलेल्या पिककर्जाच्या रक्कमेची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंकांनी आता कर्जासाठी ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे. परिणामी त्यांना यावर्षी बॅंकां पिककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत.

कर्जमाफीचा अर्ज भरला परंतु लाभ नाही
२०१६ मध्ये पिककर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले. परंतु त्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने त्यांचे कर्जमाफ हाेईल या अपेक्षेमुळे त्यांनी पिककर्ज भरले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सुद्धा बॅंकांनी ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे.

२०१६-१७ मध्ये पिककर्ज घेणाऱ्या परंतु त्यांचा भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांना बॅंकांनी ‘डिफाॅल्टर’ ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी जुने कर्ज भरून नव्या कर्जाची मागणी केल्यास त्यांना पिककर्ज देण्यात येईल.
- आलाेक तारणीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, अकाेला

Web Title: farmer crop loan in Maharashtra