आंध्राच्या मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

दीड लाख क्विंटल आवक झाल्याने दर कोसळले
नागपूर - यंदा विदर्भातील बाजारपेठांमध्ये आंध्र प्रदेशातील मिरची मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कोसळले आहेत. आंध्रच्या मिरचीने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचे चित्र यामुळे तयार झाले आहे.

दीड लाख क्विंटल आवक झाल्याने दर कोसळले
नागपूर - यंदा विदर्भातील बाजारपेठांमध्ये आंध्र प्रदेशातील मिरची मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कोसळले आहेत. आंध्रच्या मिरचीने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचे चित्र यामुळे तयार झाले आहे.

संत्रा आणि तुरीनंतर आता मिरचीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. विदर्भात यावर्षी संत्र्यांचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र, प्रारंभी नोटाबंदी आणि त्यानंतर आवक वाढल्याने दर कोसळले. हीच स्थिती तुरीच्या बाबतीत झाली. महाराष्ट्रात मिरचीची सर्वाधिक लागवड विदर्भात होते. येथील मिरचीची गुणवत्ता चांगली असल्याने सर्वत्र मागणी आहे. तर भिवापुरी मिरचीची ख्यातीदेखील सर्वदूर आहे. त्यामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. येथून देश-विदेशात मिरची जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मिरची विक्रीसाठी कळमन्यात येते.

यंदा पोषक वातावरण असल्याने महाराष्ट्रसह सर्वत्र मिरचीचे उत्पादन चांगले झाले. तथापि, आंध्रप्रदेश आणि तेलगंण येथील दर कोसळल्याने तेथील जवळपास दीड लाख क्विंटल मिरची कळमना बाजारपेठेत आली आहे. आवक भरपूर मात्र उठाव नसल्याने प्रारंभी 80 ते 90 रुपये प्रतिकिलो असलेले मिरचीचे दर सध्या 30 ते 35 रुपयांवर आले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत मिरचीचा दर 130 ते 150 रुपये प्रतिकिलो होता. यंदा चांगल्या मिरचीचा दर 40 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. इतर ठिकाणी मिरची 15 ते 20 रुपये किलो दराने विकली जात असल्याची माहिती आहे.

10 हजार क्विंटल मिरची पडून
यंदा आंध्रप्रदेश, तेलगंण येथून मिरची मोठ्या प्रमाणात आली. विदर्भातही विक्रमी उत्पादन झाले. आवक भरपूर आणि तुलनेत खरेदी नसल्याने दरात दररोज घसरण होत आहे. गेल्या महिनाभरात 10 हजार क्विंटल मिरची पडून असल्याचे समितीचे सचिव प्रशांत नेरकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.