मुख्यमंत्री मूलमध्ये अन्‌ शेजारच्या गावी शेतकऱ्याचा गळफास!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले

मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले
चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त असलेल्या पोलिस प्रशासनाच्या कानांपर्यंत ती बातमी पोहोचूनही त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत तब्बल चार तास त्या शेतकऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेतच लटकत राहिला. विरोधकांची संघर्ष यात्रा, कर्जमाफीची मागणी या साऱ्या गदारोळात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दलची ही उदासीनता पोलिस-प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ही सारी मंडळी एका उद्‌घाटनानिमित्त मंगळवारी (ता. चार) मूलमध्ये होती. त्याचदरम्यान, तेथून अवघ्या 12 किमी अंतरावर असलेल्या भादूर्णी येथे उमेद महादेव चहाकाटे (वय 48) यांनी सकाळच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेमागील झाडाला गळफास लावून जीवन संपविले. उमेदला तीन मुली आणि एक मुलगा आहे. एका मुलीचे लग्न झाले आहे. एक एकर शेती आहे. यात तीन भावांचा वाटा आहे. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी गावातूनच उधारी घेतल्याने लोक पैशांसाठी तगादा लावत होते. पण, पैसेच नसल्याने द्यायचे कुठून, या विचाराने ते त्रस्त झाले होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली.

या घटनेची माहिती उपसरपंच संतोष रेगुंडवार यांनी तातडीने मूल पोलिस ठाण्याला दिली. तिथे उपस्थित महिला कर्मचाऱ्याने, लगेच पोलिस पाठविते, असे सांगितले. मात्र, तासाभरानंतरसुद्धा कुणीही न आल्याने दुपारी बाराच्या सुमारास मृत शेतकऱ्याचा लहान भाऊ तेजराज चहाकाटे पोलिस ठाण्यात पोहोचला आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर घटनेच्या तब्बल चार तासांनंतर दुपारी दोनला पोलिस भादूर्णीला पोहोचले. तोपर्यंत उमेदचा मृतदेह झाडालाच लटकलेल्या अवस्थेत होता.
या घटनेने सारे भादूर्णी गाव हादरून गेलेले असताना शेजारच्या मूल येथे हे सर्व नेते एका कार्यक्रमासाठी आले होते. पोलिसांसाठी त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची होती. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गावातील काही माणसेही सभेसाठी आली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री विरोधकांच्या कर्जमुक्ती संघर्ष यात्रेवर आसूड ओढत होते आणि त्याचवेळी उमेदचा मृतदेह जवळच्या गावी एका झाडाला लटकत होता. त्याची पत्नी, मुले आणि गावकऱ्यांना पोलिसांच्या अनास्थेमुळे मृतदेहाजवळ बसून पोलिसांची वाट बघावी लागली. परंतु, मुख्यमंत्र्यांचा ताफा रवाना झाल्यानंतरच पोलिस घटनास्थळी पोहोचले.

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील शेतकरी विनोद रामचंद्र भोयर (वय 46, रा. कोंढा) या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतल्याची घटना घडली.

खरं कोण बोलतंय?
उपसरपंच संतोष रेगुंडवार यांनी तातडीने मूल पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली होती. ठाण्यातील कर्मचाऱ्याने पोलिस पाठविते, असे सांगितलेही. मात्र, तासाभरानंतरसुद्धा कुणीही न आल्याने पुन्हा दूरध्वनी केला असता, चहाकाटे यांच्या घरच्या कुणाला तरी तक्रार देण्यासाठी पाठवा, असे ठाण्यातून सांगण्यात आले. अखेर नाइलाजाने दुपारी बाराच्या सुमारास मृत शेतकऱ्याचा लहान भाऊ तेजराजने ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली व नंतर पोलिस पोहोचले, असे गावकरी सांगतात. पण, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण मात्र वेगळेच तत्थ्य मांडत आहेत. आत्महत्येसंदर्भात मूल पोलिस ठाण्यात पहिला दूरध्वनी आला तेव्हा शिपायाला नीट ऐकू आले नाही. थोड्या वेळाने पुन्हा दूरध्वनी आल्यानंतर पोलिस भादूर्णीत पाठविले. यासाठी केवळ दोन तासांचा वेळ झाला, असे त्यांनी सांगितले.

Web Title: farmer suicide in bhadurni