गाळमुक्त धरण, गाळयुक्‍त शिवार योजनेचा शुभारंभ

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

सिंचन प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासोबतच शेतामध्ये गाळ उपलब्ध करून दिल्यामुळे उत्पादनदेखील वाढणार आहे. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पातील गाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आहे

नागपूर - जिल्ह्यातील लहान व मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये असलेला गाळ काढून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही अभिनव संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 57 गावांमध्ये धरणांमधील गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार असून या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारपासून (ता. 10) होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. सिंचन प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासोबतच शेतामध्ये गाळ उपलब्ध करून दिल्यामुळे उत्पादनदेखील वाढणार आहे. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पातील गाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आहे. त्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील 250 हेक्‍टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पातील गाळ प्राधान्याने काढण्यात येणार आहे. लघुसिंचन विभागाकडे असलेले सिंचन प्रकल्प, पाझर तलाव, गावतलाव तसेच माजी मालगुजारी तलावामधून गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी वेस्टर्न कोल्डफिल्डतर्फे सीएसआर फंडातून निधी उपलब्ध होणार आहे. लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी तालुकास्तरांवर गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सावनेर तालुक्‍यातील 10 गावांचा समावेश आहे. तसेच पारशिवनी तालुक्‍यातील 10, कामठी तालुक्‍यातील 6, उमरेड तालुक्‍यातील 10, भिवापूर तालुक्‍यातील 10 तर कुही तालुक्‍यातील 11 गावांचा समावेश आहे. कामठी, सावनेर, पारशिवनी तसेच कुही तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये असलेल्या तलावांतील सरासरी 10 ते 15 हजार घनमीटर गाळ उपलब्ध आहे. हा गाळ शेतांमध्ये पसरविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. गाळ काढण्यासाठी कामठी तालुक्‍यातील 5 प्रकल्पांचा समावेश असून यामध्ये आसलवाडा, चिचोली, बोरपट, सेलू, चिखली आदी माजी मालगुजारी तलावांमध्ये सुमारे 60 हजार घनमीटर गाळ उपलब्ध होणार आहे. सावनेर तालुक्‍यातील 10 प्रकल्पांमधून 160 घनमीटर गाळ उपलब्ध होईल. पारशिवनी तालुक्‍यातील 10 प्रकल्पांमध्ये 260 घनमीटर गाळ काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सव्वाचार लाख शेतकऱ्यांना मोफत सातबारा
कर्जासाठी शेतकऱ्यांना सातबाराची गरज पडते. अनेकवेळा तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होते. त्यामुळे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी शेतकऱ्यांना मोफत सातबारा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू केला. गेल्या महिनाभरात 4 लाख 37 हजार 842 शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप करण्यात आला.

Web Title: Farmers to be benefited in Nagpur District