मुंबई नागपूर महामार्ग काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

श्रीधर ढगे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरण कामात खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिकावू, बागायती जमीन सरकारने घेतली. मात्र त्यांना अत्यल्प मोबदला दिला. शेतकऱ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही.

खामगाव - महामार्गात गेलेल्या जमीनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी गेल्या 55 दिवसापासून साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अखेर आज शुक्रवारी शेतकऱ्यांनी महामार्ग काम बंद पाडले आहे.

नागपूर मुंबई महामार्ग चौपदरीकरण कामात खामगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिकावू, बागायती जमीन सरकारने घेतली. मात्र त्यांना अत्यल्प मोबदला दिला. शेतकऱ्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही. नवीन कायदा लागू असतांना जुन्याच कायद्याने लवाद न नेमता जमीन अधिग्रहीत करण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांना बाजारभावा पेक्षा कमी मोबदला मिळाला. हा मोबदला नवीन भुसंपादन कायद्याच्या नुसार देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी करत आहेत. त्यांनी त्यासाठी उपोषणाही केले. मात्र सरकार व प्रशासन दखल घ्यायला तयार नाही. एक महिन्यापासून शेतकरी 55 दिवसापासून साखळी उपोषणाला बसले असले तरी त्यांच्या आंदोलनास सत्ताधारी व विरोधक यातील एकाही नेत्यांना भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही. उलट हे आंदोलन बंद करण्यासाठी संबधित ठेकेदार धमक्या देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महामार्ग काम पूर्ण होत आले असले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांनी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देवून इच्छा मरणाची परवानगी मागितली होती. त्याची सुद्धा दखल घेतली गेली नाही. अखेर आज शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. दरम्यान ही माहिती मिळताच पोलिस दाखल झाले असून तगडा बंदोबस्त लावला गेला आहे. अद्याप प्रशासनातील कोणी अधिकारी मात्र शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आले नसून शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Farmers stopped the Mumbai Nagpur highway work