स्वतःची किडनी देऊन पित्याने वाचविले मुलाचे प्राण

File Photo
File Photo

अमरावती ः आर्थिक परिस्थितीने हतबल झालेल्या पित्यासमोर मुलाच्या मृत्यूची घंटा वाजत असताना समुपदेशनाने प्रेरित होऊन पित्याने स्वतःच दानदात्याची भूमिका पार पाडून मुलाला जीवनदान दिले. ही घटना जितकी गंभीर तितकीच शेकडो गरीब व गरजू रुग्णांच्या जीवनदानाचा मार्ग सुकर करणारी आहे. राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधे यशस्वी झाली.
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील श्रीकांत गोवर्धनदास टावरी या 32 वर्षीय तरुणाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. वर्षभरापासून अमरावतीचे किडनीतज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी यांच्याकडे श्रीकांतवर उपचार सुरू होते. डायलिसीसवर जिवंत असलेल्या श्रीकांतच्या मृत्यूच्या घंटा वाजू लागल्या, तसे गोवर्धनदास यांच्याही हृदयाचे ठोके वाढले. वृद्धापकाळी आधार ठरेल, या आशेवर पाणी फेरण्याची शक्‍यता असताना एक किडनी प्रत्यारोपित केल्यास श्रीकांतला जीवनदान मिळू शकते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी येणारा खर्च किराणा व्यवसायी असलेल्या टावरी कुटुंबाच्या आवाक्‍याबाहेर होता. ते हतबल झाले. डोळ्यांसमोर अंधार पसरत असतानाच त्यांना सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी दिलासा दिला. सुपर स्पेशालिटीमध्ये किडनी प्रत्यारोपण व्हावी यासाठी दोन वर्षांपासून विविध परवानगी मिळवणाऱ्या डॉ. निकम यांनी ही शस्त्रक्रिया करण्याचे धाडस केले. श्रीकांत व गोवर्धनदास यांचे डॉ. सोनाली देशमुख, समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरोदे व सतीश वडनेरकर यांनी समुपदेशन केले. गोवर्धनदास आपली एक किडनी देण्यास तयार झाले. मंगळवारी (ता. तीन) श्रीकांतला सुपर स्पेशालिटीत दाखल करून घेतल्यावर आवश्‍यक त्या चाचण्या आटोपल्या. या शस्त्रक्रियेसाठी नागपूर व अमरावतीच्या किडनीतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. ऑपरेशन थिएटर व आयसीयू विशेषत्वाने तयार केले गेले. पहिलीच शस्त्रक्रिया असल्याने विशेष खबरदारी घेत आज, बुधवारी सकाळी सव्वाअकराला शस्त्रक्रियेला प्रारंभ झाला. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेला यश मिळाले. श्रीकांतच्या आयुष्यात नवी पहाट उगवली. आता तो उर्वरित आयुष्य आनंदात जगू शकणार आहे. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आनंद गोवर्धनदास यांना झाला. त्यांची म्हातारपणची हरवू पाहणारी काठी परत मिळाली. ती परत देण्यास अमरावती व नागपूरच्या तज्ज्ञांचे अथक प्रयत्न कामी आले. सुपर स्पेशालिटीमध्ये आता किडनी प्रत्यारोपण होऊन गरीब व गरजू रुग्णांसाठी आयुष्याचे दरवाजे उघडले जाणार आहेत.

शस्त्रक्रिया करणारे तज्ज्ञांचे पथक
नागपूरचे किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते यांच्या नेतृत्वात अमरावतीचे तज्ज्ञ डॉ. अविनाश चौधरी, सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. समीर चौबे (नागपूर), डॉ. निखिल वडनेरकर, डॉ. विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, भूलतज्ज्ञ डॉ. भाऊ राजूरकर (नागपूर), डॉ. राजेश कस्तुरे, डॉ. राम चव्हाण, डॉ. कल्याणी पिंपळे, डॉ. पौर्णिमा वानखडे, डॉ. प्रणीत घोनमोडे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

राज्यात पहिली शस्त्रक्रिया
राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेने केलेली ही पहिली शस्त्रक्रिया आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेचे अमरावती व नाशिक येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व राज्यभर जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य रुग्णालये आहेत; मात्र यांपैकी कुठेही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुविधा नाही. साधारणतः अशा शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वा खासगी रुग्णालयात होतात. त्यासाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च येतो. अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीने मात्र ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून (पूर्वीची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना) उपलब्ध करून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com