दारुड्या मुलाने केली बापाची निर्घृण हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नागपूर - मद्याच्या आहारी गेलेल्या तापट स्वभावाच्या मुलाने लाकडी ओंडक्‍याने डोक्‍यावर प्रहार केल्याने बापाचा मृत्यू झाला. आरोपीने आईवरही प्राणघातक हल्ला करीत पत्नीला बेदम मारहाण केली. यानंतर दोन्ही मुलांना बळजबरीने सोबत घेऊन पळून गेला. मुलांच्या जिवाला धोका असल्याचे ओळखून पोलिस रात्रीपासूनच त्याच्या मागावर होते. अखेर आज पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. 

नागपूर - मद्याच्या आहारी गेलेल्या तापट स्वभावाच्या मुलाने लाकडी ओंडक्‍याने डोक्‍यावर प्रहार केल्याने बापाचा मृत्यू झाला. आरोपीने आईवरही प्राणघातक हल्ला करीत पत्नीला बेदम मारहाण केली. यानंतर दोन्ही मुलांना बळजबरीने सोबत घेऊन पळून गेला. मुलांच्या जिवाला धोका असल्याचे ओळखून पोलिस रात्रीपासूनच त्याच्या मागावर होते. अखेर आज पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. 

ठमाजी सटवाजी गयाळी (70) रा. श्रीरामनगर, वायसीसी कॉलेजमागे, वानाडोंगरी असे मृताचे तर उमेश गयाळी (32) असे आरोपी मुलाचे नाव आहे. उमेशकडे बोलेरो वाहन असून प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. तो शीघ्रकोपी स्वभावाचा असून मद्याच्या आहारी गेला आहे. लहान-सहान कारणांवरून तो नेहमीच कुटुंबीयांना मारहाण करीत होता. गुरुवारी रात्री त्याने दारू ढोसली. यानंतर घरी परतत असताना हिंगणा परिसरात एका युवकाशी त्याचा वाद झाला. घरी परतल्यानंतर त्याने वडील ठमाजी, आई लक्ष्मी (65) आणि पत्नी नंदा (30) यांच्याशीही वाद घातला. रागाच्या भरात घरातील सरपणासाठी आणलेल्या लाकडी ओंडक्‍याने डोक्‍यावर प्रहार केल्याने वडील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. मध्यस्थीसाठी धावलेल्या आईच्या डोक्‍यावरही त्याने लाकडी ओंडक्‍याने प्रहार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पत्नी नंदालासुद्धा बेदम मारहाण केली. पकडले जाण्याच्या भीतीने आदेश (9) आणि दुर्गेश (7) या दोन्ही मुलांना बळजबरीने सोबत घेऊन पळून गेला. 

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. उमेशच्या डोक्‍यात शैतान संचारला असून मुलांच्या जिवाला धोका असल्याने पोलिसांनी लागलीच आरोपीचा शोध सुरू केला. विशेष पथक गठित करून हिंगणा परिसरातील वागधरा जंगलात त्याचा शोध घेण्याची जबाबदारी टाकण्यात आली. रात्रभर पोलिसांनी जंगलाचा कानाकोपरा हुडकून काढला. वरिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा रात्रभर शोधमोहिमेवर लक्ष ठेवून होते आणि वेळोवेळी तपास पथकाला मार्गदर्शन करीत होते. शोधमोहीम सुरू असताना आज सकाळी हिंगण्यातील धर्मपुरा भागातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. 

रागाच्या भरात हत्या केल्याची कबुली 
आरोपी उमेश फारच तापट स्वभावाचा आहे. त्यातही दारू ढोसली की, तो कुटुंबीय, मित्र, शेजारी असे कुणाशीही वाद घालत होता. त्याची भांडखोर वृत्ती आणि शिवीगाळ करण्याच्या सवयीमुळे शेजारीही त्रस्त होते. गुरुवारीसुद्धा मद्यधुंद अवस्थेत घरी आल्याने वडिलांनी जाब विचारल्याने हत्याकांड घडले. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्याला धनगरपुरा परिसरातून ताब्यात घेतले. त्याने रागाच्या भरात वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. 

Web Title: Father's brutal murder