नागपूर देशातील पहिला डिजिटल जिल्हा

नागपूर देशातील पहिला डिजिटल जिल्हा

सर्व ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी
नागपूर - जिल्ह्यातील 776 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर केबलद्वारे जोडून इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी देण्यात आली आहे. प्रत्येक गावापर्यंत इंटरनेट सुविधा असलेला नागपूर हा देशातील पहिला डिजिटल जिल्हा ठरला असून, 500 ग्रामपंचायतींमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध असल्याची माहिती बीएसएनएलच्या महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क प्रकल्पांतर्गत 2014 मध्ये नागपूरची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली होती. शहरासह 13 तालुक्‍यांमध्ये एकूण 1,600 किमी ऑप्टिकल फायबर केबल टाकून ग्रामपंचायतींना कनेक्‍ट करण्यात आले आहे. 30 कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतसह प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळेसह अन्य संस्था व नागरिकांना अखंडित, दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गावपातळीवर शंभर एमबीपीएस इंटरनेटमुळे 60 ते 70 सेकंदांत चित्रपट डाउनलोड करणे शक्‍य झाले आहे.

ग्रामपंचायतपर्यंत केबल पोहोचल्याने कुणालाही इंटरनेट जोडणी सहज मिळविता येणार आहे.

पहिल्या डिजिटल जिल्ह्यातील नागरिकांना गणतंत्र दिनानिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे. त्यानुसार 1 जीबी डाटा केवळ 4 रुपयांत मिळेल. परंतु, ही ऑफर केवळ 90 दिवसांसाठीच आहे. यासह अन्य ऑफरची घोषणाही बीएसएनएलतर्फे करण्यात आली आहे. पेपरलेस पद्धतीवर बीएसएनएलने भर दिला आहे. यामुळे कागदपत्रांशिवाय केवळ बोटांचे ठसे घेऊन सीम दिले जात आहे. बिलही ऑनलाइन पाठविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीनेच बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पत्रपरिषदेला महाव्यवस्थापक (मोबाईल) एस. के. अग्रवाल, सह महाव्यवस्थापक पी. के. एस. बारापात्रे उपस्थित होते.

पंचायत समिती, तलाठी कार्यालयांनाही कनेक्‍टिव्हिटी
लवकरच 70 तलाठी आणि 13 पंचायत समिती कार्यालयेही कनेक्‍ट करण्यात येत आहेत. आतापर्यंत 50 तलाठी कार्यालये कनेक्‍ट करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालये जोण्यासाठी कार्यादेश देण्यात आला आहे. ही कामे गतीने पूर्ण होतील, असा विश्‍वास तिवारी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com