बोचऱ्या थंडीने घेतला शहरात पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नागपूर - विदर्भात थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली असून, शहरात बोचऱ्या थंडीने पहिला बळीदेखील घेतला. दोन-तीन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे संकेत, प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे.

नागपूर - विदर्भात थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली असून, शहरात बोचऱ्या थंडीने पहिला बळीदेखील घेतला. दोन-तीन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे संकेत, प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे.

उत्तर भारतात सध्या शीतलहरसदृश वातावरण असल्यामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात पारा घसरला आहे. उपराजधनीत दोन-तीन दिवसांपासून गारठा व बोचरी थंडी जाणवू लागली आहे. थंडीने शुक्रवारी शहरात बळीदेखील घेतला. सदर भागात 45 वर्षीय अनोळखी व्यक्‍ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केला. थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. शहरात सरासरीपेक्षा तब्बल चार अंशांनी पारा घसरून 11.8 अंश सेल्सिअसवर स्थिरावला. कमाल तापमानातही किंचित घट झाली. विदर्भातील सर्वच शहरांमध्ये पारा झपाट्याने खाली घसरतो आहे. शुक्रवारी सर्वांत कमी तापमानाची नोंद यवतमाळ येथे (11.0 अंश सेल्सिअस) करण्यात आली. याशिवाय अमरावती (11.4 अंश सेल्सिअस), गोंदिया (12.0 अंश सेल्अिसस), अकोला (12.1 अंश सेल्सिअस) आणि वर्धा (12.5 अंश सेल्सिअस) येथेही थंडीचा परिणाम दिसून आला. सायंकाळपासूनच हवेत गारठा पसरतो आहे. मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता आणखीणच जाणवते आहे. थंडीमुळे एसी बंद झाले असून, पंख्यांचीही घरघर थांबली आहे. वातावरण अचानक बदलल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार आता डोके वर काढू लागले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पारा आणखी खाली जाण्याची शक्‍यता असल्यामुळे गारठा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.