मृत्यूने वेढलेल्या पुरातील जगण्याचा संघर्ष

मृत्यूने वेढलेल्या पुरातील जगण्याचा संघर्ष

भरत फुंडे यांनी तब्बल ९ तास काढले झाडावर

सालेकसा - गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे अचानक आगमन झाले. शेतकरी सुखावला. भरदुपारी पाऊस झाल्याने शेतात कामावर असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पावसाच्या धाराप्रमाणे वाहू लागला. मात्र, हाच पाऊस आपल्या जिवावर बेतू शकतो याची तिळमात्र, कल्पनाही कित्येक शेतकऱ्यांना नव्हती. अशाच शेतकऱ्यांमधील भरत फुंडे. 

पाऊस थांबल्यानंतर शेतातून घरी परतताना त्याच्यासमोर मृत्यूचा सापळा होता. एक नव्हे तर तब्बल ९ तास त्याने झाडावर काढले. क्षणोक्षणी मृत्यू त्याच्याजवळ येता होता. पण, भरतने धीर सोडला नाही. शेवटी मृत्यू हरला आणि भरत जिंकला.

सालेकसा तालुक्‍यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेल्या शेतात पुराचे पाणी घुसले व या वेळी पुरात अडकलेल्या ६० वर्षीय भरत फुंडे यांनी शेतातील झाडावर चढून तब्बल ९ तास जगण्याचा संघर्ष केला. सुदैवाने या दुर्घटनेत त्यांचे प्राण वाचले. परंतु,  हा ९ तासांचा संघर्ष त्यांच्याकरिता क्षणाक्षणाला मृत्यूचा काळच ठरला. 

आमगाव खुर्द येथील भरत फुंडे व त्यांचा मुलगा अजय हे शेतातील मोटारपंप सुरू करण्याकरिता सकाळीच शेतात पोहोचले होते. रस्त्यातील नाल्याला आलेला पूर पाहता भरत फुंडे यांनी अजयला सायकल घेऊन माघारी पाठविले. भरत फुंडे शेतात गेले. तेव्हा नदीकाठी असलेले त्यांचे शेत काही क्षणातच जलमय झाले. या वेळी जीव वाचविण्याकरिता फुंडे यांनी शेतातीलच आंब्याच्या झाडाचा आसरा घेतला. संपर्काची सर्व साधने तुटलेली, जीव मुठीत घेऊन भरत फुंडे आंब्याच्या झाडावर तर खाली  नदीचा पूर अशा सर्व भयानक परिस्थितीत त्यांनी तब्बल ९ तास झाडावर काढले. अखेर त्यांचा मुलगा अजय हा मामाला घेऊन घटनास्थळी पोहोचला आणि अथक प्रयत्न करून भरत फुंडे यांचे प्राण वाचविले. त्यांचा हा संघर्षाचा अनुभव ऐकून अद्याप गावकऱ्यांच्या अंगावर काटा येतो.

आपत्ती व्यवस्थापन गेले कुठे?

सालेकसा तालुक्‍यात दरवर्षीच पूरपरिस्थिती व नागरिकांना होणारा त्रास नित्याची बाब आहे. असे असताना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा फक्त कागदोपत्रीच दिसून येते, अशी नागरिकांची तक्रार आहे. भरत फुंडे यांच्याप्रकरणी मदतीची अपेक्षा असताना मदत तर दूर, प्रशासनाच्या वतीने त्यांची साधी विचारपूससुद्धा झाली नाही. त्यामुळे तालुक्‍यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नेमकी करते काय, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

लोकप्रतिनिधींची अनास्था

शेतकरी आत्महत्या वाढत आहे. नापिकी त्यांच्या पाचवीला पुंजली आहे. कठीण समयी शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. रात्री-बेरात्री जीव धोक्‍यात घालून शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार विम्याचे साधे कवच देऊ शकत नाही. पीकविम्याच्या नावाखाली कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते. मात्र, विदर्भात दुष्काळ असताना त्यांच्या विम्याचे पैसे कुठे जातात, असा साधा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत. तर रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांप्रति कळवळा दाखविणारा लोकप्रतिनिधी अशाप्रसंगी कुठे जातो, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com