अन्न पुरवठा विभागाची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

शिधापत्रिका तयार करण्याचे काम थांबले; लाभार्थी त्रस्त 
अर्जुनी मोरगाव -  येथील तहसील कार्यालयाचा प्रमुख घटक असलेल्या अन्न पुरवठा विभागाची ऑनलाइन प्रक्रिया दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या विभागातून शिधापत्रिकांसह अन्य कोणतीही कामे होत नसल्याने लाभार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. 

शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांचे संगणकीकरण झाले आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. अर्जुनी मोरगाव तालुका हा आदिवासी, नक्षलप्रभावित असून, शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सोबतच शेतमजुरांची संख्यादेखील मोठी आहे. सध्या तालुक्‍यात कॅशलेस व्यवहाराचे जाळे पसरविले जात आहे. स्वस्त धान्य दुकानातूनही जानेवारी महिन्यापासून डिजिटल पद्धतीने व्यवहार सुरू होणार आहे. परंतु, या तालुक्‍यातील इंटरनेटसेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गावांत इंटरनेटसेवा उपलब्ध नसल्याने ऑनलाइन पद्धतीने कामे करणे कठीण झाले आहे. 

येथील तहसील कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना सातबारा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तहसील कार्यालयातील महत्त्वाचा विभाग असलेला अन्न पुरवठा विभाग सध्या ऑनलाइन प्रक्रिया डाटा एन्ट्री बंद असल्याने कमालीचा त्रस्त आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, संपूर्ण जिल्हाभर विभागाची ऑनलाइन सेवा बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे शिधापत्रिका तयार करण्याचे काम दोन महिन्यांपासून रेंगाळले आहे. परिणामी, दूरवरून या विभागात कामाकरिता येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना तीन दिवसानंतर किंवा पुढील आठवड्यात येण्याचे सांगत आहेत. त्यानुसार, नागरिक कामानिमित्त येत आहेत. परंतु, त्यांना आल्यापावलीच परत जावे लागत आहे. या गंभीर प्रश्‍नाकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: food supply department online process stop

टॅग्स