राज्यात चार बिबट्या सफारीस मान्यता

राजेश रामपूरकर
रविवार, 9 एप्रिल 2017

संजय गांधी उद्यानासह चंद्रपूर, अमरावती आणि जुन्नरमध्ये प्रकल्प

संजय गांधी उद्यानासह चंद्रपूर, अमरावती आणि जुन्नरमध्ये प्रकल्प
नागपूर - राज्यात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह चंद्रपूर, अमरावती आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील आंबेगव्हाण येथे बिबट्या सफारी लवकरच सुरू होणार आहे. राज्य वन्यजीव मंडळाने त्याला मान्यता दिली आहे. राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सल्लागार नियुक्तीसाठी प्रक्रिया पूर्ण झाली. पुढीस आठ दिवसांत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

संजय गांधी उद्यानातील निवारा केंद्रात (110 चौरस फूट) 22 बिबटे आहेत, त्यांना मोकळा अधिवास मिळण्याच्या दृष्टीने बिबट्याच्या सफारीचा उपक्रम सुरू करण्याचा उद्यान व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. या सफारीसाठी व्याघ्र आणि सिंह सफारीलगतची 20 हेक्‍टर जागा उपलब्ध होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर चार बिबट्यांना सकाळच्या सुमारास सफारीत सोडून रात्री पुन्हा त्यांच्या निवारा केंद्रात सोडले जाईल. त्यांना तेथे खाद्य पुरवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील आंबेगव्हाण येथे नियोजित बिबट सफारीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. चाकण- आंळदी रस्त्यावरील वनविभागाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जागेची पाहणी, चाचपणी करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अमरावती जिल्ह्यातील वडाळी येथेही सफारी प्रकल्प सुरू करण्याचा पहिले प्रस्ताव होता. मात्र, त्याचा नागरी वसाहतीला त्रास होण्याची शक्‍यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे हा प्रकल्प आता 25 किलोमीटर अंतरावर हलविला आहे. चंद्रपूर येथील बिबट सफारीची जागा अद्याप निश्‍चित झालेली नसली, तरी प्रस्ताव तयार केला आहे.

बिबट सफारी सुरू करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. वेगवेगळे सल्लागार नियुक्त करण्यापेक्षा अधिकृत पॅनेलच्या माध्यमातून सल्लागारांची नियुक्ती होणार आहे. त्यादृष्टीने कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार नागपूर येथील मुख्यालयात नऊ अर्ज आले आहेत. नऊ अर्जापैकी चार सल्लागांराच्या नावावर त्यांच्या गुणवत्तेनुसार शिक्कामोर्तब केले जाईल.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारीही बिबट्या सफारी सुरू करण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येणार आहे. बिबट्या सफारीसोबतच चंद्रपूर येथे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या "बफर' क्षेत्रात व्याघ्र सफारी सुरू करण्याची योजना आहे. या दोन्ही सफारी एकत्र होऊ शकतात का, याची पडताळणीही केली जाणार आहे.
- संजय ठाकरे, सदस्य सचिव,

Web Title: four leopard safari permission