राज्यात वर्षभरात अडीच लाख टन इंधन बचत 

राज्यात वर्षभरात अडीच लाख टन इंधन बचत 

नागपूर - "आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे राज्यात दरवर्षी अडीच लाख टनांपेक्षा अधिक जळाऊ लाकडाची बचत होत आहे. तसेच गावातील महिलांच्या जीवनामानातही सुधारणा झाली आहे. अतिरिक्त वेळात महिला बचतगट अथवा इतर कामांत हातभार लावू लागल्या आहेत. 

मानवी वस्त्यांचा जंगलावर पडणारा ताण कमी करण्यासाठी गावकऱ्यांना एलपीजी सिलिंडर, बायोगॅस संयंत्र आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या साहित्याचा पुरवठा केला जात आहे. वनविभागातर्फे एस. सी., एस.टी. आणि सर्वसाधारण गटातील नागरिकांना एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येते. त्यात एससी गटातून 1 लाख 32 हजार 325 तर सर्वसाधारण गटातून 63 हजार 192 एलपीजी गॅस सिलिंडरचे वाटप झाले आहे. एस. टी. गटात 11 हजार 638 सिलिंडरचे वाटप केले आहे. 

शामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतून तीन वर्षांत व्याघ्र सुरक्षित भागात जंगलात राहणाऱ्यांना 40 हजार 326 एलपीजी कनेक्‍शन दिले आहे. चार ते पाच कुटुंबाला दररोज चार किलोग्रॅम जळाऊ लाकूड इंधन म्हणून लागते. गावकरी शेतातून अथवा जंगलातून लाकूड आणतात. ते जाळतात. त्यामुळे वनांचे अथवा वृक्षांची तोड होते. गावकरी जंगलात जातात आणि वनस्पती झाडे त्यांचा डहाळ्या तसेच फांद्या त्यांची दररोजची गरज पूर्ण करण्यासाठी तोडतात. त्याचा विपरीत परिणाम नैसर्गिक पुनःवाढ यावर होतो. चुलीमध्ये लाकूड वापरल्यामुळे होणाऱ्या धुराने महिलांच्या आरोग्यांवर परिणाम होतो. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने आता महिलाच स्वतःहून स्वयंपाकासाठी गॅसची मागणी करीत आहेत. त्यामुळे कार्बन बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले. जळावू लाकडाचा वापर स्वयंपाकात होत नसल्याने गावातील स्वच्छतेमध्ये सुधारणा झाली आहे. अमरावती, यवतमाळ, नाशिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्येदेखील गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या गावकऱ्यांची संख्या वाढली आहे. 

एलपीजी सिलिंडर वाटप कार्यक्रमाला गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असतानाच त्रुटीदेखील समोर येऊ लागल्या आहेत. गॅस सिलिंडर संपल्यानंतर रिफिल करण्यासाठी गावकऱ्यांना घ्यावे लागणारे हेलपाटे हा या उपक्रमाच्या मार्गातील मोठा अडसर ठरला आहे. 
-तुकाराम आत्राम 

उपक्रमाचे चांगले परिणाम 
राज्यात 15 हजार 500 जंगलालगतच्या गावांमध्ये 2 लाख 70 हजार 169 गावकऱ्यांना गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वृक्षतोडीमुळे नैसर्गिक संपत्तीची अपरिमित हानी होत असल्याने वनविभागाने जंगलातील वृक्षांची स्थानिकाकडून सरपणासाठी कत्तल केली जाऊ नये म्हणून एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा निर्णय घेतला. जंगलालगतच्या गावांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध झाल्याने रोज सरपणासाठी होणारी लाकूडतोड थांबली आहे. अनेक भागांत या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com