जनजागृतीसोबतच दंडात्मक कारवाईची गरज

जनजागृतीसोबतच दंडात्मक कारवाईची गरज

नागपूर - नैसर्गिक जलाशयांमध्ये होणाऱ्या गणपती विसर्जनामुळे जलाशयांतील ऑक्‍सिजनची पातळी कमी होत असल्याचे धक्‍कादायक वास्तव ‘सकाळ’ने प्रकाशित केले. जलाशयातील ऑक्‍सिजनची क्षमता कमी झाल्यामुळे स्वाभाविकरीत्या जलचरांवर संकट ओढवले आहे. मात्र, संकट केवळ जलचरांपुरते नसून याचा फटका पर्यायाने मानवालाही बसणार आहे. यामुळे नैसर्गिक जलाशयांऐवजी कृत्रिम टॅंकवर विसर्जन करण्यात यावे आणि निर्माल्याचा उपयोग खत म्हणून करण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्थांद्वारे जनजागृती होत आहे. याला समाजातून सकारात्मक प्रतिसादही मिळतोय. पण, याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे.

एकीकडे सरकार विविध गोष्टींसाठी कायदे बनवित असताना जलाशय प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणारा कायदा का करत नाही, असाही सवाल उपस्थित झाला आहे. केवळ सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यापुरता स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या समाजात जलाशयांप्रती दाखविण्यात येणारी संवेदनशीलता कालमर्यादित न राहता ती कायस्वरूपी रहावी, टिकावी आणि मनामनात रुजावी, यासाठी एका लोकचळवळीची आणि सरकारच्या सकारात्मक दृष्टीची गरज असल्याची भावना ‘सकाळ’कडे व्यक्त करण्यात आली. 

जागोजागी कृत्रिम तलाव हवे
अलीकडच्या काळात गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पीओपी आणि रासायनिक रंगांचा सर्रास वापर करण्यात येतो. यामुळे जलप्रदूषणाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कृत्रिम तलाव त्यावर उत्तम उपाय आहे. प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जागोजागी कृत्रिम तलाव तयार केल्यास प्रदूषण नियंत्रणाला मोठा हातभार लागू शकतो. 
- सौरभ डवरे, जानकीनगर

उत्सवाचा फटका निसर्गाला नको
जलाशयांमध्ये होणाऱ्या मूर्ती आणि निर्माल्य विसर्जनामुळे जलचरांवर संकट ओढवले आहे. तसेच त्यांच्यामुळे नैसर्गिकरीत्या होणारे प्रदूषण नियंत्रण आता बंद होत आहे. परिणामत: डेंगीसारखे आजार बळावले आहेत. भारत हा उत्सवप्रिय देश आहे. यामुळे सर्वधर्मीयांचे उत्सव साजरे व्हायला हवेत. मात्र, याचा फटका निसर्गाला बसायला नको. पर्यावरणामुळे आपण समृद्ध आणि आरोग्यदायी आयुष्य जगू शकतोय याचा विसर पडू नये. 
- ॲड. गणेश खानझोडे, नागपूर

सोशल मीडियावरून जनजागृती हवी
नद्या व तलावांमध्ये अनेक छोटे-मोठे जीवजंतू असतात. पर्यावरणाच्या संतुलनासाठी हे जीवजंतू जगणे आवश्‍यक असते. मात्र, गणेशोत्सव काळात पाण्यात सोडण्यात येणाऱ्या धोकादायक रंगांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. शिवाय पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. नैसर्गिक तलावाऐवजी कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करण्यासाठी गणेशभक्‍तांना प्रेरित करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरून जनजागृतीची आवश्‍यकता आहे. 
- सारंग ढवळे, दिघोरी

दंडात्मक कारवाईची गरज
प्रबोधन आणि जनजागृतीने आपला समाज सुधारणारा नाही. गणेशोत्सव आला की काही काळापुरते पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वातावरण तयार होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ ही वृत्ती समाजाची आहे. यामुळे सरकारनेच यासाठी कायदा करून दंडात्मक कारवाई करायला हवी. अनेक गोष्टींसाठी कायदा तयार होत असताना पर्यावरण वाचविण्यासाठी तलावांत विसर्जन आणि निर्माल्य फेकण्याविरुद्ध कायदा करण्यात काहीही गैर नाही. 
- ॲड. विजय मोरांडे, नागपूर

असे करा घरगुती मूर्तीचे विसर्जन
प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच कॅल्शियम सल्फेट हे साध्या पाण्यात विरघळत नाही. यावर संशोधन करून एनसीएल संशोधकांनी अनेक प्रयोगानंतर बेकरीत वापरला जाणारा खाण्याचा सोडा म्हणजेच अमोनियम बायकार्बोनेट हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे शास्त्रीय पद्धतीने सहज विघटन करत असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करणे सहज शक्‍य आहे. मूर्ती पूर्णपणे बुडेल अशा आकाराच्या व उंचीच्या बादलीत पाणी घेऊन, अंदाजे मूर्तीच्या वजनाइतका बेकरीत वापरला जाणारा सोडा (अमोनियम बायकार्बोनेट) पाण्यामध्ये घालून ते मिश्रण चांगले ढवळावे. निर्माल्य व सजावटीच्या वस्तू बाजूला काढून फक्त मूर्तीचे त्या मिश्रणात विसर्जन करावे किंवा साध्या पाण्यात विसर्जन करून नंतर मूर्ती या मिश्रणामध्ये ठेवावी. दर दोन-तीन तासांनंतर ते मिश्रण हलके ढवळावे. मूर्ती ४८ तासांत पूर्ण विरघळते. यानंतर बादलीच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेटचा थर जमा होतो. स्थिर झालेले पाणी हे अमोनियम सल्फेट असून ते अतिशय उत्तम दर्जाचे खत आहे. त्याचा थेट वापर झाडांसाठी करता येऊ शकतो. विघटनातून उरलेल्या कॅल्शियम कार्बोनेटचे अनेकविध उपयोग आहेत. 

भावनांवर हवे नियंत्रण
गणेशोत्सव हा जरी आनंदाचा सण असला तरी युवकांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे. पर्यावरणाचा विचार करून उत्सव साजरा करावा. शासनाकडून जणजागृती केवळ सण-उत्सावाच्या तोंडावरच केली जाते. त्यानंतर मात्र, कुणालाही काही देणे-घेणे नसते. त्यामुळे सातत्याने जणजागृतीची गरज आहे. पर्यावरण वाचविणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. 
- चेतन चापके

जलचरांचा गुदमरतोय श्‍वास
शहरातील लोकसंख्या वाढत असताना ‘पीओपी’ मूर्ती बसविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेत. सुबक व आकर्षक रंगसंगतीमुळे पीओपी मूर्तीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. अनंत चतुर्दशीला घरगुती मूर्तीही तलावांमध्ये विसर्जित न करता कृत्रिम तलावात कराव्यात. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगामुळे तलाव आणि नद्यामधील जैवविविधता धोक्‍यात आलेली आहे. त्यामुळे पाण्याचे जडत्व वाढते आणि पाण्यातील मासे आदींचा श्‍वास गुदमरणार आहे. 
- सुरेंद्र पांडे, अध्यक्ष, युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, नागपूर शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com