गृहिणींच्या "किचन बॅंक'वर घाला

File photo
File photo

गृहिणींच्या "किचन बॅंक'वर घाला
नागपूर : पाच महिन्यांत घरगुती सिलिंडर (अनुदानित) दरात 183 रुपयांची वाढ झाली आहे. दर महिन्यात 40 ते 50 रुपयांची वाढ होत असून बचतीसाठी "किचन'मधील वेगवेगळ्या डब्यात पैसे साठवून ठेवणाऱ्या गृहिणींच्या या "किचन बॅंक'वर घाला घातल्याने सरकारच्या नावाने त्या बोट मोडत आहे. ऑक्‍टोबरमध्ये सिलिंडरसाठी गृहिणींना तत्काळ 931 रुपये द्यावे लागत असून मागील महिन्याच्या तुलनेत ही वाढ 59 रुपये आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलच्या दरवाढीमुळे चाकरमान्यांची पंचाईत झाली तर डिझेलच्या दरवाढीमुळे आवश्‍यक घरगुती किराणा, भाजीपाला यात वाढ झाली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष याचा ताण घरांतील महिलांवर पडत आहे. आता सिलिंडरच्या दरात दर महिन्याला सरकार जवळपास पन्नास रुपयांची वाढ करीत आहे. घरगुती सिलिंडरसाठी अनुदान दर महिन्याला 25 ते 30 रुपये वाढत असले तरी घरी सिलिंडर येताच महिलांना हजार रुपयांची नोटच द्यावी लागत आहे. दर महिन्याला सिलिंडरचे दर बदलत असून सप्टेंबरमध्ये 872 दर असलेले सिलिंडर या महिन्यात 931 रुपयांत खरेदी करावे लागले. ही वाढ 59 रुपयांची आहे. त्यातही वितरकांकडून येणारा कर्मचारी तिसऱ्या, चौथ्या माळ्यावर पोहोचविण्यासाठी 10 ते 20 रुपये जास्त घेतो. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये सिलिंडर साडेनऊशे रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे गृहिणींना घरातील खर्चासाठी कुटुंबप्रमुखांकडून जी रक्कम दिली जाते, त्यातून त्या थोडीफार बचत करतात. सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे त्यांच्या बचतीवरच सरकारने घाला घातल्याचे चित्र आहे. विरोधात असताना भाजपचे नेत्यांनी सिलिंडर, पेट्रोल दरवाढीवर रान उठविले होते. आता कुठे गेले हे नेते? असा संतप्त सवालही गृहिणी सीमा पाटमासे हिने व्यक्त केला. सिलिंडरचे साडेतीनशेपर्यंत अनुदान जमा होईल, परंतु घरी आल्यानंतर नगदी साडेनऊशे रुपये वितकराकडून येणाऱ्या कर्मचाऱ्याला द्यावे लागत आहेत. त्यामुळे कधी कधी दूध, दह्यासाठी राखीव ठेवलेले पैसेही द्यावे लागत असल्याचे वर्षा शेलोटकर म्हणाल्या.
दिवाळीत हजारांचा टप्पा ओलांडणार
जून महिन्यांत घरगुती सिलिंडरचा दर 748 रुपये होता. गेल्या पाच महिन्यांत 183 रुपयांची वाढ झाली आहे. दर महिन्याला 40 ते 50 रुपयांची वाढ होत असल्याने पुढील महिन्यात ऐन दिवाळीत घरगुती सिलिंडरसाठी गृहिणींना तत्काळ हजार रुपये मोजावे लागणार असल्याचे चित्र आहे.
जूनपासून आतापर्यंतचे दर
महिना सिलिंडरचे दर
जून 748 रुपये
ऑगस्ट 334.82 रुपये
सप्टेंबर 872 रुपये
ऑक्‍टोबर 931 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com