दिवाळीत सिलिंडर हजारापर्यंत?

Cylinder
Cylinder

नागपूर - विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ होत असताना अनुदानित सिलिंडरच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये अनुदानित सिलिंडरसाठी ग्राहकांना एजन्सीच्या कर्मचाऱ्याला दारावर ८७२ रुपये द्यावे लागत असून दिवाळीपर्यंत हजार रुपयांपर्यंत ही वाढ होण्याची शक्‍यता काही वितरकांनी व्यक्त केली. बॅंकेत अनुदान जमा होत असले तरी दारावर ग्राहकांना थेट हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके सोसत असलेल्या सर्वसामान्यांना आज दारावर अनुदानित गॅस सिलिंडरसाठी नऊशे रुपये मोजावे लागत आहेत. या सिलिंडरचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होत असले तरी गरीब तसेच मध्यमवर्गीयांना महिन्याला सिलिंडरसाठी हजार रुपयांची तजविज करून ठेवावी लागते. जूनमध्ये ७४८ रुपयांत घरी येणारे सिलिंडर सप्टेंबरमध्ये ८७२ रुपयांपर्यंत पोहोचले. चार महिन्यांत घरी येणाऱ्या सिलिंडरच्या किमतीत १३४ रुपये भर पडली. पुढील महिन्यात यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. एवढेच नव्हे, घरगुती अनुदानित सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

मात्र, बॅंकेत थेट अनुदान जमा होत असल्याने या वाढीकडे सामान्य जनतेचे लक्षच नसल्याचे दिसून येते. जूनमध्ये अनुदानित सिलिंडरसाठी ७४८ रुपये द्यावे लागत होते. यातील २४५ रुपये अनुदान ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा झाले. अर्थात ग्राहकांना ५०३ रुपयांत गॅस सिलिंडर पडले. ऑगस्टमध्ये ग्राहकांना अनुदानित सिलिंडरसाठी ८४२ रुपये मोजावे लागले. यातील ३३४ रुपयांचे अनुदान बॅंक खात्यात जमा झाले. 

याचाच अर्थ ऑगस्टमध्ये सिलिंडर ५०८ रुपयांत पडले. अर्थात दोन महिन्यांत सिलिंडरच्या दरात पाच रुपयांची वाढ झाली. 

परस्पर वितरक बदलल्याने तारांबळ 
एच.पी. या कंपनीने ग्राहकांचे वितरक परस्पर बदलल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नियमित वितरकाकडे गॅस सिलिंडरबाबत विचारणा केली असताना तुम्हाला सिलिंडर देता येणार नाही, तुमचा वितरक बदलला आहे, असे उत्तर वितरकांकडून मिळत आहे. सिलिंडर संपल्यानंतर ऐनवेळी कुठे धावाधाव करावी, असा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याचा दावा करणाऱ्या हिंदुस्‍तान पेट्रोलियमने साधे एसएमएस पाठवून हा बदल ग्राहकांना कळविण्याचे सौजन्य दाखविले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com