प्रेयसीकडून अल्पवयीन प्रियकरावर ब्लेडने हल्ला 

crime
crime

नागपूर : अल्पवयीन प्रियकराने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने प्रियकरावर ब्लेडने हल्ला करून चेहरा विद्रूप केला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर युवतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. शुभांगी (19) असे प्रेयसीचे नाव असून हर्ष (17, बदललेले नाव) दोन्ही रा. भांडे प्लॉट अशी या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. 

कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी आणि हर्ष दोघेही शेजारी राहतात. त्यामुळे त्यांची ऐकमेकाच्या घरी ये-जा होती. हर्षची आई मराठी लावणी नृत्य कलावंत असून ती राज्यभर कार्यक्रम करते. त्यामुळे कधी कधी शुभांगी ही हर्षच्या आईसोबत नृत्याच्या कार्यक्रमाला जात असे. त्यातूनच चार पाच महिन्यांपूर्वी हर्ष आणि शुभांगी यांचे सूत जुळले. दोघांच्या चोरून-लपून भेट होत होत्या. हा प्रकार हर्षच्या आईच्या लक्षात आला. त्यामुळे तिने शुभांगीला घरी येण्यास मनाई केली. त्याचप्रमाणे हर्षला देखील शुभांगीसोबत संबंध न ठेवण्याची ताकीद दिली. त्यामुळे हर्षने तिच्यासोबतचे संबंध तोडून तिला भेटण्यास तो टाळाटाळ करीत होता. त्यामुळे शुभांगी संतप्त झाली होती. 

काल रात्री दोनच्या सुमारास शुभांगीने हर्षला फोन करून आताच्या आता तू माझ्या घरी ये. घरी न आल्यास मी माझ्या जीवाला काहीही करून घेईन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत हर्ष तिच्या घरासमोर गेला. त्यांच्यात वाद झाला असता शुभांगीने त्याच्या चेहऱ्यावर वार करून त्याला रक्तबंबाळ केले. रक्तबंबाळ अवस्थेत हर्ष घरी गेला आणि आईवडिलांना माहिती दिली. हर्षला घेऊन त्याचे आईवडिल कळमना पोलिस ठाण्यात आले. त्यांनी शुभांगीविरूद्ध तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

शुभांगी स्वतःहून ठाण्यात 
मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यामुळे महिलेला अटक करता येत नाही. त्यामुळे तिला ताकिद देण्यात आली. मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास शुभांगी ही तिच्या आईसोबत पोलिस ठाण्यात आली. पोलिस ठाण्यात येताच तिने आपल्या डाव्या हातावर ब्लेडने वार करून नस कापण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कळमना पोलिसांनी 324 अन्वये गुन्हा नोंदवून शुभांगीला ताब्यात घेतले. 

यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी ही तापट स्वभावाची असून यापूर्वी तिने यापूर्वीही दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. तिच्या या वागण्यामुळे तिचे कुटुंबीय देखील त्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वयाच्या चौदाव्या वर्षांपासून शरीरात विशिष्ट बदल घडतात. प्रेम म्हणजे काय हे समजण्यापूर्वीच त्यांना शारीरिक आकर्षण निर्माण होते. मनाविरूद्ध काही सहन होत नाही. परिणामतः मुलांमध्ये आक्रमकता वाढते. या वयातील कुमार काल्पनिक जगात वावरतो. पालक आणि पाल्यांमध्ये सुसंवाद असल्यास अशा घटना टाळता येतील. 
-डॉ. राजा आकाश, मानसोपचार तज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com