तरुणांनाच उमेदवारी देणार - ऍड. अणे

तरुणांनाच उमेदवारी देणार - ऍड. अणे

नागपूर - चार पक्ष फिरून आलेले नेते नव्हे तर तरुणच आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, असे राज्याचे माजी महाधिवक्ता आणि नव्याने स्थापन झालेल्या विदर्भ राज्य आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. श्रीहरी अणे यांनी आज स्पष्ट केले. पक्ष स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी "कॉफी विथ सकाळ‘ या उपक्रमात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका, विदर्भाचे आंदोलन तसेच अन्य विषयांवर मनमोकळी चर्चा केली. 


केवळ आंदोलन करून किंवा मेणबत्त्या घेऊन चौकात उभे राहिल्याने वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी पूर्ण होणार नाही. त्यासाठी व्यवस्थेचाच भाग होऊन जोर लावावा लागणार आहे. त्यामुळेच राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक लढणे हे आंदोलन पुढे नेण्यासाठीचे तर्कसंगत पाऊल असल्याचे ते म्हणाले. अणे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरल्यानंतर आंदोलनाला धार आली आहे. निव्वळ आंदोलनाच्या भरवशावर ही मागणी मान्य होऊ शकत नाही हा मुद्दा स्पष्ट करताना "कुठल्याही आंदोलनाचा शेवट कसा होतो, हे आपल्याला ठाऊक आहे. तेलंगणचा मुद्दा लावून धरणारे खासदार संसदेत होते म्हणून ते शक्‍य झाले. आंदोलन करून व्यवस्था बदलणेही शक्‍य नाही, हे अण्णांच्या चळवळीत अरविंद केजरीवाल यांना लक्षात आले. त्यांनीही व्यवस्थेचा भाग होण्यासाठी निवडणूक लढवलीच,‘ असे त्यांनी सांगितले. 

 
आपला लढा भाजप आणि कॉंग्रेसविरुद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. "विदर्भाच्या विकासासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकार देणे गरजेचे होते. तसे झाले असते तर विकासाचा प्रवाह गावपातळीवरून शहराकडे आला असता. दुसरीकडे शेतकरी आत्महत्या होत असताना नागपुरात मेट्रो आणून काय साध्य होणार आहे हे कळत नाही,‘ असे अणे म्हणाले.

"त्यांना माझी भीती वाटतेय‘
"गेल्या अनेक वर्षांमध्ये वकिली करताना माझ्या विदर्भवादी असण्याने फारसा फरक पडला नाही. कारण राज ठाकरे यांची टोल टॅक्‍सची केस मी लढलो आणि त्याहीपूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेदेखील मतदान हक्कासंदर्भातील एक प्रकरण मी सांभाळले होते. त्यावेळीदेखील मी विदर्भवादीच होतो. पण, आता विदर्भ राज्याच्या चळवळीचा चेहरा म्हणून आता त्यांना माझी भीती वाटतेय. त्याच भीतीपोटी हा उद्वेग निर्माण झाला आहे,‘ असा टोला त्यांनी मनसे आणि शिवसेनेला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com