मणप्पुरम गोल्डवर नऊ कोटींचा दरोडा 

मणप्पुरम गोल्डवर नऊ कोटींचा दरोडा 

नागपूर - जरीपटका पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील मणप्पुरम गोल्ड फायनान्सच्या हायप्रोफाइल कार्यालयावर सहा दरोडेखोरांनी भरदुपारी धाडसी दरोडा घातला. चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूल काढून 30 किलो सोने आणि तीन लाख रोख घेऊन अवघ्या 15 मिनिटांत दुचाकीने पळाले. या सोन्याची किंमत तब्बल साडेनऊ कोटींच्या घरात आहेत. आजवरच्या नोंदीत शहरातील सर्वांत मोठा दरोडा समजला जात आहे. 

जरीपटक्‍यातील सिमेंट रोडवरील भीमचौकात मणप्पुरम गोल्ड लोनचे कार्यालय आहे. बुधवारी दुपारी चारपर्यंत कार्यालयात सुरळीत काम सुरू होते. अचानक सहा जण हातात पिस्तूल घेऊन कार्यालयात दाखल झाले. "जान प्यारी हैं तो हात खडे करो' अशी धमकी त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली. शाखेचा व्यवस्थापक, चार कर्मचारी व महिलेसह पाच ग्राहकांना दरोडेखोरांनी बंधक बनवले. सर्वांचे मोबाईल हिसकावले. त्यानंतर दरोडेखोरांपैकी चौघांनी कार्यालयातील लॉकरमधील सोन्याचे दागिने पिशवीत भरण्यास सुरवात केली. पिशवी कमी पडल्याने त्यांनी बॅंकेतील मणप्पूरम लिहिलेल्या पिशवीत सोने कोंबले. यावेळी दोघे पिस्तूल रोखून उभे होते. अगदी 18 मिनिटांत दरोडेखोरांनी जवळपास 30 किलो सोन्याचे दागिने आणि काउंटरमध्ये ठेवलेली तीन लाखांच्या रकमेवर हात साफ केला. दरोडेखोर पसार झाल्यानंतर व्यवस्थापकाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. जरीपटका पोलिसांना घटनास्थळावर पोहोचायला थोडा उशीरच झाला. पंचनामा करून सोने आणि रोख गेल्याची नोंद केली. गेल्या चार महिन्यांपूर्वी बोरकर नावाच्या शाखा व्यवस्थापकाने काम सोडले होते. त्यांच्या जागी नवीन शाखा व्यवस्थापक काम सांभाळत होते. 

सीसीटीव्हीत कैद 
पिस्तूलधारी सहा दरोडेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते. पिस्तुलाच्या धाकावर टाकलेला दरोडा कार्यालयातील चारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला. दरोडेखोरांची भाषा आणि शरीरयष्टीवरून गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. सीसीटीव्हीचे फुटेज गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. 

सिक्‍युरिटी गार्ड नव्हता 
बुधवारी मणप्पूरम गोल्ड लोन कार्यालयात गेल्या चार महिन्यांपासून सिक्‍युरिटी गार्ड नव्हता. त्यामुळे बॅंकेचे कर्मचारीच आतून कुलूप बंद करून काम करीत असत. ग्राहक आल्यावर कुलूप उघडत होते. ही संधी साधून दरोडेखोरांनी दरोडा टाकला. काही बाबी पोलिसांना संशयास्पद वाटत आहेत. यामध्ये कार्यालयातील कुणी जुन्या किंवा सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. 

ग्राहकांचे नुकसान होणार नाही 
मणप्पुरम कार्यालयात दरोडा पडला असला तरी ग्राहकांचे हित संपूर्णतः सुरक्षित आहे. सोन्याच्या दागिन्यांचा विमा काढलेला होता. त्यामुळे ग्राहकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. या प्रकरणात पोलिसांना तपासांत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मण्णपुरम फायनान्स कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. 

ग्राहकांचे हिसकले मोबाईल 
सहा दरोडेखोर बॅंकेत घुसले. त्यावेळी एक महिला व चार पुरुष ग्राहक उपस्थित होते. त्यांनी बॅंकेचे शटर लावून घेतले. त्यानंतर पिस्तुलाच्या धाकावर प्रत्येकाचे मोबाईल हिसकले. "जान प्यारी हैं तो होशियारी न करें, अन्यथा ठोक देंगे' अशी धमकी दिली. त्यानंतर शाखा व्यवस्थापकाच्या डोक्‍याला पिस्तूल लावून लॉकरमधील सोने लुटले. 

दरोडेखोर परप्रांतीय 
दरोडेखार हिंदी भाषेचा वापर करीत होते. आतमध्ये घुसताच "शांत रहो, अन्यथा मारे जाओगे' अशी धमकी दिली. ते आपसांत हिंदी भाषेत संवाद साधत होते. भाषेच्या लकबीवरून ते उत्तर प्रदेश किंवा बिहारचे असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सोन्याच्या वजनामुळे दरोडेखोरास पिशवी उचलल्या जात नव्हती. शेवटी दोघांनी मिळून पिशवी घेऊन पळ काढला. 

घर में पडा हैं सोना... तो काहे रोना 
मणप्पुरम गोल्ड फायनान्सच्या जाहिराती अक्षयकुमार तसेच अनेक बडे अभिनेते करतात. "घर में पडा हैं सोना... तो काहे को रोना' ही त्यांची टॅगलाइन आहे. येथे 15 मिनिटांत सोने तारण ठेवल्यावर त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे अनेक जण घरातील सोने मणप्पुरममध्ये तारण ठेवतात. मात्र, आता ग्राहकांवर "रोना ही रोना' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

मंगळवारीच होते अलर्टचे आदेश 
पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशन यांनी मंगळवारी जिमखान्यात मासिक बैठकीत शहरातील क्राइम कंट्रोलसाठी पोलिसांना आणखी अलर्ट राहावे लागेल, प्रत्येक ठाणेदारांनी गांभीर्य दाखवावे, असे निर्देश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला दुसऱ्याच दिवशी तडा गेला. दरोडा पडल्यानंतर पोलिस आयुक्‍त डॉ. वेंकटेशम, सहआयुक्‍त संतोष रस्तोगी, अति. आयुक्‍त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्‍त अभिनाश कुमार, सहायक आयुक्‍त नीलेश राऊत यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com