पंढरपुरात राष्ट्रसंतांना मिळाली ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती

File photo
File photo

वर्धा : ग्रामगीता मानवाची आचारसंहिता, आजच्या काळातही संजीवनी देणारा ग्रंथ मानला जातो. 22 जुलै 1953 च्या आषाढी एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यभूमी पंढरपूर येथे ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती मिळाली. येणाऱ्या आषाढी एकादशीला या घटनेस 65 वर्षे पूर्ण होत आहेत. या आठवणीला आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांनी उजाळा दिला.
ग्रामगीता हा ग्रंथ आडवा नसून, उभा आहे. ग्रामगीता आदर्श नागरिक घडविण्याची गुरुकिल्ली आहे. स्वतंत्र भारताचे ते दुसरे संविधान असल्याची भावनाही रामकृष्णदादा यांनी व्यक्त केली. पुण्यक्षेत्र पंढरपूरच्या वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर बसले असताना राष्ट्रसंतांना दृष्टांत झाला. ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात ते म्हणतात,
तेथे दृष्टांत होई अद्‌भुत। कासया करावी विश्‍वाची मात।
प्रथम ग्रामगीताची हातात । घ्यावी म्हणे ।।
"ओम नमाजी विश्‍वचालका' या मूळ अक्षरापासून राष्ट्रसंतांनी धावत्या प्रवासामध्ये ग्रामगीता हा युगग्रंथ पूर्ण केला. देशातील जनतेला पोथी-पुराणामध्ये अडकवून न ठेवता दैनंदिन जीवन जगण्याची दिशादर्शक माहिती राष्ट्रसंतांनी या ग्रंथात समाविष्ट केली आहे. दिल्ली ते गल्लीतील लोकांनी कसे वागावे, याचा वस्तुपाठ या ग्रंथाने घालून दिला आहे.
अंधश्रद्धा, ग्रामस्वच्छता, स्त्री-पुरुष समानता, कुटुंब कल्याण, महिला विकास, शेती विकास, ग्रामविकास हे सर्व मुद्दे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत समाविष्ट केले. सामुदायिक जीवनातून विकास कसा साधावा, हेही हा ग्रंथ सांगतो, असेही रामकृष्णदादांनी स्पष्ट केले.
नव्या पिढीने ग्रंथाचे अनुकरण करावे
ग्रामगीतेचे 41 अध्याय, चार हजार 655 ओवी आहेत. पाच अध्याय मिळून एक पंचक आहे. प्रत्येक अध्यायाला एका महापुरुषाचे प्रमाण देण्यात आले. यात सर्व धर्मांचा समन्वय त्यांनी साधला आहे. भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी 1956 ला लोकसभेत ठराव घेऊन खरा भारत बघायचा असेल; तर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत बघा, असे म्हटले होते. येत्या आषाढी एकादशीला ग्रामगीता 66 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचा आनंद रामकृष्णदादांनी व्यक्त केला. नव्या पिढीने या ग्रंथाचे अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com