जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला मिळणार झळाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

उद्योग, व्यापार, ग्राहक आणि सरकार सर्वांनाच लाभ मिळणार आहेत. अर्थव्यवस्थेला झळाळी मिळणार आहे. प्रक्रिया सुलभ होईल आणि कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीही दूर होणार आहेत

नागपूर - वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर देशातील संपूर्ण बाजार एक होणार असून ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. देशभरात एकाच दरात वस्तू मिळतील. यामुळे हा कर सर्वांच्याच फायद्याचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क विभाग व सेवा करचे मुख्य आयुक्त ए. के. पांडे आणि विक्रीकर विभागाचे संयुक्त आयुक्त पी. के. अग्रवाल यांनी येथे केले.

विदर्भातील "जीएसटी क्‍लिनिक'च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्हीआयएचे सचिव सुहास बुधे उपस्थित होते. ते म्हणाले जीएसटी कर पद्धती लागू करण्याच्या दृष्टीने दोन्ही विभाग सज्ज करण्यात येत आहेत. अनेक टप्पे पूर्ण झालेले असून काही काम शिल्लक आहेत. जूनपर्यंत दोन्ही कार्यालयातील यंत्रणा सज्ज केली जाणार आहे. पांडे म्हणाले, उद्योग, व्यापार, ग्राहक आणि सरकार सर्वांनाच लाभ मिळणार आहेत. अर्थव्यवस्थेला झळाळी मिळणार आहे. प्रक्रिया सुलभ होईल आणि कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणीही दूर होणार आहेत.

अग्रवाल म्हणाले, विक्रीकर विभाग पूर्णपणे जीएसटी कर पद्धतीच्या दृष्टीने सज्ज झालेला आहे. लहान-लहान शहरात जीएसटीबद्दल व्यापाऱ्यांमध्ये जागरूक करण्यात येत आहेत. यामुळेच विदर्भात 50 हजारांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांची जीएसटीअंतर्गत नोंदणी करण्यात आलेली आहे. एक जूनपासून पुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरही अपडेट करण्यात येतील.

अशोक चांडक म्हणाले, जीएसटी प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. मात्र, यासमोर अनेक आव्हाने आहेत. व्यापाऱ्यांची मानसिकता अद्याप बदललेली नाही. दहा दिवसांत परतावा करण्याचे आश्‍वासन दिले जाते. मात्र, 90 दिवसापर्यंत परतावा मिळत नाहीत. प्रयत्न स्तुत्य आहे. परंतु, एक देश एक कर अशी स्थिती नाही. पाच जीएसटी तयार करण्यात आलेले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी अप्पर आयुक्त आशीष चंदन, नरेश जकोटिया, ओ. एस. बागडिया, मिलिंद पटेल आदी उपस्थित होते.