पालकमंत्री "इफेक्‍ट', पाणीपुरवठा सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नागपूर - शहरातील पाणीटंचाईवरील बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसावल्यानंतर आज अनेक भागांत पाणीपुरवठा मुबलक व सुरळीत झाला. नगरसेवक, आमदारांनी या बैठकीत अधिकाऱ्यांवर पाणीटंचाईबाबत रोष व्यक्त केला होता.

नागपूर - शहरातील पाणीटंचाईवरील बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसावल्यानंतर आज अनेक भागांत पाणीपुरवठा मुबलक व सुरळीत झाला. नगरसेवक, आमदारांनी या बैठकीत अधिकाऱ्यांवर पाणीटंचाईबाबत रोष व्यक्त केला होता.

शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूकडे आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील जनतेला पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत असून नगरसेवक, आमदारांतही रोष वाढला होता. अखेर सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिका जलप्रदाय विभागासह ओसीडब्ल्यूचेही अधिकारी उपस्थित होते. अनेक भागांत पाणी मिळत नाही. अनेक वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची गाऱ्हाणी या बैठकीत नगरसेवक, आमदारांनी केली. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळी जलप्रदाय विभागासह ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या पालकमंत्र्यांनी त्यांना चांगलेच खडसावले. प्रत्येक वस्तीमध्ये फिरून पाणीटंचाईची कारणे जाणून घ्या व लोकांना पाणीपुरवठा करा, अन्यथा कारवाईचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

पालकमंत्र्यांच्या बैठकीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांत कमी दाबाने किंवा पाणीच न येणाऱ्या भागांमध्ये आज मुबलक पाणी मिळाले. सुभाषनगर, गोपालनगर, अंबाझरी, लक्ष्मीनगर या भागात पाणीपुरवठा झाला; मात्र अद्याप काही भागात पाण्याची समस्या कायम आहे. परंतु, पालकमंत्री 25 तारखेला पुन्हा बैठक घेणार असल्याने अधिकारी पाणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, काल झालेल्या वादळी बैठकीत फाईल फेकणाऱ्या ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला कारणे दाखवा बजावण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती.

Web Title: guardian minister effect water supply clear