आरोग्यसेवा कोलमडली

नागपूर - आरोग्य उपसंचालक कार्यालयात गुरुवारी आंदोलन करताना आरोग्यसेविका.
नागपूर - आरोग्य उपसंचालक कार्यालयात गुरुवारी आंदोलन करताना आरोग्यसेविका.

नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दिल्या जाणाऱ्या रुग्णसेवेचा केंद्रबिंदू गावखेड्यातील माणूस आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेचा भार सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांसह इतर कर्मचाऱ्यांनी गुरुवार, १२ एप्रिलपासून काम बंद केले. समान काम समान वेतन मिळावे, यासाठी त्यांनी बंद पुकारला असून पहिल्याच दिवशी गावखेड्यातील आरोग्यसेवा कोलमडली आहे.

रुग्णालयांत साधे उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर उभे राहण्यासाठीदेखील कर्मचारी नसल्याची माहिती पुढे आली आहे. सारे उपकेंद्र रिकामे आहेत. ७०० वर कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने गावखेड्यातील आरोग्यसेवा रामभरोसे आहे. 

नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात गुरुवारी दिवसभर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन पुकारले. 

गावखेड्यात आरोग्यसेविकेच्या भरवशावर गर्भवती मातांच्या लसीकरणासह सर्वच प्रकारच्या रुग्णांना हाताळावे लागते. क्षयग्रस्तापासून तर कुटुंब कल्याण कार्यक्रमात सहभागी ती असते. आरोग्य सेविकांमार्फत सारीच कामे केली जातात. समान काम करून वेतनात मोठी तफावत आहे. समान वेतन मिळत नसल्याने वर्षानुवर्षे अडचण सहन करणे असह्य झाल्याने आरोग्यसेविका आदिवासी पाड्यांपर्यंत जायलादेखील तयार नसल्याने संपूर्ण आरोग्य व्यवस्था मोडकळीस  येण्याची स्थिती उद्भवली आहे. 

कुठून आणायच्या गर्भवती माता?    
आरोग्य उपकेंद्रांतील आरोग्यसेविकांना महिन्यात तीन प्रसूती करण्याची सक्ती करण्याचा  अफलातून निर्णय सरकारने घेतला आहे. वास्तविक प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते तालुका आरोग्य केंद्रात सेवा देण्यास स्त्रीरोग प्रसूती शास्त्रज्ज्ञ डॉक्‍टरही तयार नाहीत. मात्र, उपकेंद्रातील आरोग्यसेविकांवर तीन प्रसूती सक्तीची करण्याचा अफलातून निर्णय घेतला. दर महिन्याला कुठून गर्भवती माता आणाव्यात, असा सवाल आंदोलनकर्त्या आरोग्यसेविकांनी विचारला आहे.  

कंत्राटीकरण बंद करा 
गावखेड्यात अतिदुर्गम भागात आरोग्यसेविका जोखमीची कामे करतात. ऊन, वारा, पाऊस झेलत आरोग्यसेवा देतात. मात्र, त्यांना वर्षानुवर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर ठेवण्यात येते. कंत्राटी सेवेदरम्यान मिळणारे वेतनही तुटपुंजे असते. वेतनवाढीसह शासनाच्या सर्वच सवलतीपासून त्या दूर आहेत. त्यांच्या कामाचे मूल्यमापन कमी दाखविले की, त्यांना थेट घरचा रस्ता दाखवला जातो. 

गावखेड्यातील बालमृत्यू कमी झाले
आरोग्यसेविका जबाबदारीने काम करीत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीची संख्या वाढली. विशेष असे की, संस्थेत होणारी प्रसूतीची संख्या वाढल्यामुळे बालमृत्यू दर कमी झाला. हे आरोग्य विभागाने मान्य केले. मात्र, समान वेतन देण्यास शासन तयार  नसल्याची शोकांतिका आरोग्यसेविकांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com