उपराजधानीत आरोग्य विद्यापीठाचा स्पंदन महोत्सव 

उपराजधानीत आरोग्य विद्यापीठाचा स्पंदन महोत्सव 

नागपूर - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे 2 ते 5 मार्चदरम्यान उपराजधानीत "स्पंदन-2017 महोत्सव' आयोजित केला आहे. गुरुवारी (ता. 2) सकाळी साडेदहा वाजता सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर उपस्थित राहतील, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विद्यापीठाशी संलग्नित राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची महाविद्यालये, दंत महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, युनानी, होमिओपॅथी, बीएससी नर्सिंग कॉलेज अशा 56 महाविद्यालयांतील 1500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी डॉ. देशपांडे सभागृहातून अवयवदान रॅली काढण्यात येईल. अहिंसा चौक, वेस्ट हायकोर्ट रोड, लॉ-कॉलेज, आरटीओ, भोले पेट्रोलपंप, राजाराणी चौक, टेम्पल मार्गावरून देशपांडे सभागृहात विसर्जित होईल. यानंतर लय, ताल आणि गती यांचा त्रिवेणी संगम असलेल्या विविध वैद्यकीय विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सादर होईल. संगीत, नृत्य, नाट्य, ललित आणि साहित्य या पाच प्रमुख कलांसह 30 विविध उपकलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येतील. 3 मार्च रोजी "स्वस्थ आणि समृद्ध जीवन' विषयावर उपराजधानीत आरोग्य दिंडी काढण्यात येणार आहे. यात आरोग्याचा मंत्र देण्यात येणारे चित्ररथ राहतील. 5 मार्च रोजी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सिनेअभिनेत्री सई ताह्मणकर यांच्या उपस्थितीत समारोप होईल, असे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. मनीषा कोठेकर, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. समीर गोलावार, डॉ. वैभव कारेमोरे, जनसंपर्क अधिकारी स्वप्निल तोरणे, विलास खनगण उपस्थित होते. 

वैद्यकीय व्यवसायातील विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास व्हावा. त्यांना सामाजिक भान यावे. समाजात आरोग्यदायी संदेश पोहचावा या उद्देशपूर्तीसाठी सामाजिक आशयाचा सांस्कृतिक महोत्सव म्हणजे स्पंदन महोत्सव-2017 होय. 
-डॉ. मोहन खामगावकर, प्र-कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com