शेकडो गावांना पुराचा तडाखा

शेकडो गावांना पुराचा तडाखा

विदर्भ जलमय; गडचिरोलीतील २०० गावे संपर्काबाहेर
नागपूर - गेल्या चार दिवसांपासून विदर्भात संततधार सुरू आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावे जलमय झाली. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे विदर्भातील शेकडो गावांना पुराचा तडाखा बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंदाजे २०० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून, लाखोंचे नुकसान झाले.

गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात २४ तासांत २९४.६ मिमी इतका पाऊस झाला. हवामान खात्याने अतिवृष्टीची नोंद केली आहे. गोंदिया तालुक्‍यात २२ मिमी, गोरेगाव १.६ मिमी, तिरोडा ६५.९ मिमी, देवरी ५६ मिमी, आमगाव १९.४ मिमी, सालेकसा ५१.६ मिमी आणि सडक अर्जुनी तालुक्‍यात ३८.६ मिमी इतका पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्‍यात मंगळवारी साधारण पावसाची नोंद झाली. उर्वरित भागांत दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. नागपूर जिल्ह्यातसुद्धा मंगळवारी साधारण पाऊस झाला. तर, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने शेतीकामांना वेग आला. चोवीस तासांत जिल्ह्यात ९५.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. बल्लारपूर तालुक्‍यात सर्वाधिक १८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील १२ प्रकल्पांपैकी नलेश्‍वर आणि दिना हे दोन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. मूल तालुक्‍यातील चिरोली-केळझर, राजोली-पेठगाव आणि मूल-पिपरी दीक्षित हे तीन मार्ग बंद होते. वर्धा जिल्ह्यातील सर्व भागांत रिमझिम पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यात मात्र संततधार सुरूच असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

तिसऱ्या दिवशीही अनेक मार्ग बंदच
गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने मंगळवारी तिसऱ्या दिवशीही अनेक मार्ग बंद होते. काल दुपारी पावसाने उसंत घेतली होती. मात्र, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा नदी-नाल्यांच्या पाण्यात वाढ झाल्याने आजही २०० गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडलगतची पर्लकोटा-आष्टी मार्गावरील दिना नदी, गडचिरोलीलगतची शिवणी नाला, गडअहेरी नाला, वैलोचना नदीला पूर असल्याने या मार्गांची वाहतूक आजही बंद होती. जिल्ह्यात संततधार पावसाने पूरपरिस्थिती गंभीर आहे. दीडशेवर घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. गडचिरोली तालुक्‍यातील अमिर्झा येथील गावतलाव फुटल्याने शंभर हेक्‍टर क्षेत्रातील धानपऱ्हे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com